Maharashtra Day 2021: महाराष्ट्राच्या प्रगतीत कामगारांचे योगदान मोलाचे - पालकमंत्री बाळासाहेब पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 12:17 IST2021-05-01T12:16:24+5:302021-05-01T12:17:02+5:30
Maharashtra Day 2021: नागरिकांनी स्वत:ची तसेच आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन करुन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.

Maharashtra Day 2021: महाराष्ट्राच्या प्रगतीत कामगारांचे योगदान मोलाचे - पालकमंत्री बाळासाहेब पाटील
सातारा : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि सातारचे सुपुत्र स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. त्यांच्या विचारधारेवरच राज्य शासन काम करीत आहे. महाराष्ट्र दिनाबरोबरच कामगार दिन आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीत कामगारांचे योगदान मोलाचे आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ व्या वर्धापन दिनामित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांगणात पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. या शासकीय ध्वजारोहणास प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, साताराच्या नगराध्यक्षा माधवी कदम, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते. या ७१ वा महाराष्ट्र दिनावर कोरोनाचे सावट होते. काही मोजके अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच हा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. देशावर तसेच राज्यावर कोरोनाचे संकट आहे. नागरिकांनी स्वत:ची तसेच आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन करुन पालकमंत्री पाटील यांनी महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.