फलटणच्या तलाठी कार्यालयाला कुलूप : शाळा प्रवेशाला अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:57 IST2019-05-29T00:55:56+5:302019-05-29T00:57:50+5:30
फलटणचे तलाठी हे कार्यालयात हजर नसतात. तसेच तलाठी कार्यालयास सदानकदा कुलूप लावलेले असते. त्यामुळे गावातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. अनेक हेलपाटे मारूनही कामे होत नसल्याने शेतकऱ्यांचे

फलटण शहरातील तलाठी कार्यालय कायमच बंद अवस्थेत असते. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.
फलटण : फलटणचे तलाठी हे कार्यालयात हजर नसतात. तसेच तलाठी कार्यालयास सदानकदा कुलूप लावलेले असते. त्यामुळे गावातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. अनेक हेलपाटे मारूनही कामे होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
मुलाच्या शैक्षणिक कामासाठी विविध प्रकारच्या दाखल्याची व पीक कर्जासाठी सातबारा व खातेउताऱ्यांची आवश्यकता असते. त्यासाठी अनेक शेतकरी तलाठी कार्यालयात दररोज येत आहेत. परंतु यापूर्वीचे तलाठी ८ मेपासून रजेवर गेले आहेत.
फलटण तलाठी कार्यालयाची पर्यायी जबाबदारी ठाकुरकी व फरांदवाडी गावच्या तलाठी यांच्याकडे देण्यात आली. परंतु गेली वीस दिवस बुरुड गल्ली येथे असणाºया फलटण तलाठी कार्यालयात तलाठी सतत गैरहजर राहत होत्या. सोमवार, दि. २७ रोजी अनेक नागरिक कामानिमित्त तलाठी कार्यालयात आले असता त्यांना तलाठी नसल्याने कार्यालयास कुलूप लावलेले दिसले.
काही नागरिक मोती चौक येथील रिव्हेन्यू कार्यालयात ठाकुरकी व फरांदवाडी गावच्या तलाठी कार्यालयात फलटण तलाठी यांचा शोध घेण्यासाठी गेले असता या ठिकाणीही तलाठी नसल्याने नागरिक हैराण झाले होते. फलटण येथील तलाठी कार्यालय बंद असल्याने सातबारा, खाते उतारा, विविध दाखले, विविध नोंदीच्या कामासाठी हेलपाटे मारून वयोवृद्ध शेतकरी कंटाळून गेले आहेत.
संबंधित तलाठी यांच्या अनुपस्थितीमुळे पीक कर्ज विविध दाखले यापासून वंचित राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. सध्या सुरू असलेली दुष्काळ परिस्थितीमुळे तलाठी यांनी त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी राहण्याची व तलाठी कार्यालयात उपस्थित राहण्याची आवश्यकता असताना तलाठी हजर राहत नसल्याने ग्रामस्तरावरील अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
फलटण तालुक्यातील तलाठी कार्यालयात हजर नसल्याच्या तक्रारी वाढल्या असून, नागरिक व शेतकरी यांच्या तक्रारीकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने कोणाकडे दाद मागायची हा प्रश्न आहे.
फलटण तालुक्यातील अनेक गावांमध्ये तलाठी कार्यालयांत वेळेवर उपस्थित नसतात. यासंदर्भात मी वारंवार तहसीलदार तसेच प्रांताधिकाºयांना निवेदन दिलेले आहेत. परंतु, प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होताना दिसत नाही. यामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे.
- प्रदीप झणझणे,
शिवसेना फलटण तालुकाप्रमुख