Local Body Election Voting: सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी वाद, राडा अन् ठिय्या आंदोलन; ६५ टक्के झाले मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 14:15 IST2025-12-03T14:15:04+5:302025-12-03T14:15:23+5:30
म्हसवडला पोलिसांसमोर राडा

Local Body Election Voting: सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी वाद, राडा अन् ठिय्या आंदोलन; ६५ टक्के झाले मतदान
सातारा : जिल्ह्यातील ७ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी मंगळवारी (दि. २) चुरशीने मतदान झाले. सुमारे ६५ टक्क्यांवर मतदारांनी आपला हक्क बजावला. पण, या निवडणुकीला अनेक ठिकाणी गालबोट लागले. काही ठिकाणी वाद झाला, तर कुठे राडा घडला. सातारा शहरात तर उमेदवाराने पैसे वाटप करून चिन्ह दाखविल्याचा आरोप करत शिंदेसेनेचा उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला.
सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, फलटण, मलकापूर, वाई, रहिमपूर, म्हसवड, पाचगणी आणि वाई या ९ नगरपालिकांची, तर मेढा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली होती. पण, फलटण आणि महाबळेश्वरची निवडणूक न्यायालयात याचिका दाखल केल्याने पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे ७ पालिका आणि एका नगरपंचायतीसाठी मंगळवारी उत्साहात मतदान झाले.
म्हसवडला पोलिसांसमोर राडा
१. मलकापूर निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला. मागील वेळी ८२ टक्क्यांवर मतदान गेले होते. पण, सायंकाळपर्यंत सरासरी ६८.५ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रहिमतपूर पालिकेसाठीही किरकोळ वादवगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
२. म्हसवड पालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला गाडी तपासण्याच्या कारणावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांत पोलिसांसमोरच राडा झाला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाद निवळला. मतदानादरम्यान पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
३. वाईतही भांडणामुळे निवडणुकीला गालबोट लागले. गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. मेढा नगरपंचायतीसाठी शांततेत ८४ टक्क्यांवर मतदान झाले.
४. कराडलाही किरकोळ अपवादवगळता शांततेत मतदान पार पडले. साधारण ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा झाल्या होत्या. त्यानंतरही लाडक्या बहिणींच्या मतांचा टक्का कमी दिसून आला.
८ नगराध्यक्ष अन् १८९ नगरसेवकपदासाठी मतदान
जिल्ह्यातील सात नगरपालिका आणि एका नगरपंचायतीतील ८ नगराध्यक्ष आणि एकूण १८९ नगरसेवकपदासाठी मतदान झाले. यापूर्वी जिल्ह्यातील विविध नगरपालिकांतील ११ नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत. कराड आणि मलकापूर येथील तीन जागांची निवडणूक पुढे गेली आहे.