साताऱ्यात पावसाचा जोर कमी; पण, धरणसाठ्यातील पाणीपातळी वाढू लागली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 15:58 IST2022-07-15T15:57:29+5:302022-07-15T15:58:06+5:30
आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. यामुळे पेरणीच्या कामालाही वेग येणार आहे

साताऱ्यात पावसाचा जोर कमी; पण, धरणसाठ्यातील पाणीपातळी वाढू लागली
सातारा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून धुवांधार सुरू असणाऱ्या पावसाचा जोर कमी झाला आहे. परंतु, धरणांतील साठ्यात वेगाने वाढ होत आहे. यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी काही धरणांतून विसर्ग सुरू झालाय. तर कोयनेतील साठा ५० टीएमसीच्या उंबरठ्यावर पोहोचलाय. २४ तासांत धरणात चार टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.
जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पाऊस पडत होता. विशेष करुन पश्चिम भागात पावसाचा जोर होता. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. लोकांना घराबाहेरही पडणे मुश्कील झाले होते. तसेच रस्त्यावर दरडी कोसळणे, पुलावरुन पाणी वाहणे यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला होता.
आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. यामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. तसेच पेरणीच्या कामालाही वेग येणार आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नवजा येथे ५७ आणि महाबळेश्वरला १४३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर जूनपासून आतापर्यंत कोयनेला १७८२, नवजा २१८० आणि महाबळेश्वर येथे सर्वाधिक २३१७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.