Satara-Local Body Election: कराडला नेते ‘दक्ष’, त्यांचे अपक्षांवर ‘लक्ष’; बंडखोरी थोपवण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 19:42 IST2025-11-21T19:40:11+5:302025-11-21T19:42:28+5:30
तब्बल २५ वर्षांनंतर खुल्या प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद आरक्षित झाल्याने निवडणुकीत इच्छुकांची भाऊगर्दी

Satara-Local Body Election: कराडला नेते ‘दक्ष’, त्यांचे अपक्षांवर ‘लक्ष’; बंडखोरी थोपवण्याचे आव्हान
प्रमोद सुकरे
कराड : येथील नगरपालिका निवडणूक २ डिसेंबर रोजी होत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर नगराध्यक्ष पदासाठी २२ तर नगरसेवक पदासाठी ३३० अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर नगराध्यक्ष पदासाठी १७ तर नगरसेवक पदासाठी २५९ अर्ज उरले आहेत. हे उरलेले अर्ज पक्ष, आघाड्यांसाठी डोकेदुखी बनली असून, नेते ‘दक्ष’ झाले आहेत. त्यांचे या अपेक्षांवर ‘लक्ष’ असून, आता कोण कोण अर्ज मागे घेणार, हे पहावे लागणार आहे.
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून कराड शहराची ओळख आहे. त्यामुळे साहजिकच येथील नगरपालिका निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून कराड नगरपालिकेला ओळखले जाते. मात्र, सुमारे ४ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर होऊ घातलेल्या निवडणुकीला खूपच महत्त्व आले आहे.
कराड पालिका निवडणुकीसाठी १५ प्रभागांतून ३१ नगरसेवक तर थेट जनतेतून १ नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. तर तब्बल २५ वर्षांनंतर खुल्या प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद आरक्षित झाल्याने निवडणुकीत इच्छुकांची भाऊगर्दी निर्माण झाली आहे.
पालिकेच्या निवडणुकीत भाजप व काँग्रेस स्वबळावर रिंगणात उतरले आहेत तर दोन्ही राष्ट्रवादी व शिंदेसेना यांनी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणे पसंत केले आहे. या सगळ्यांकडेच इच्छुकांची मोठी संख्या होती. पण पक्षाची व आघाडीची उमेदवारी देताना सर्वांचेच समाधान होऊ शकलेले नाही. त्यामुळे अनेक अर्ज अपक्ष म्हणून शिल्लक राहिले आहेत. पण यातील अनेकजण बंडाची भाषा बोलू लागल्याने त्यांना थंड करण्याचे आव्हान नेत्यांसमोर आहे.
शुक्रवार, दि. २१ पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने ‘दक्ष’ नेत्यांनी या अपक्षांवर ‘लक्ष’ केंद्रित केले असून, ते कोणा कोणाची मनधरणी करण्यात यशस्वी होतात, हे शुक्रवारी स्पष्ट होणार आहे.
६० उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात
नगरसेवक पदासाठी २५९ अर्ज शिल्लक राहिले आहेत. कराडला तिरंगी लढतीचे चित्र गृहित धरल्यास ९३ उमेदवार रिंगणात उतरतील. पण इतर उरलेल्या अर्जांत एका उमेदवाराचे २/३ असे अर्ज दाखल असल्याने ते अर्ज जास्त वाटत आहेत. प्रत्यक्षात ६० उमेदवार अपक्ष म्हणून सध्या रिंगणात दिसत आहेत. त्यांची मनधरणी करताना नेत्यांना कसरत करावी लागणार आहे.