कृष्णा कारखाना निवडणूक : मोहितेंच्या 'मनोमिलन' प्रक्रियेतून पृथ्वीराज चव्हाण बाहेर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 09:23 PM2021-06-07T21:23:57+5:302021-06-07T21:24:25+5:30

तिरंगी लढतीची शक्यता; चर्चेचं गुऱ्हाळ थांबणार

Krishna factory election: Prithviraj Chavan out of Mohite's 'manomilan' process! | कृष्णा कारखाना निवडणूक : मोहितेंच्या 'मनोमिलन' प्रक्रियेतून पृथ्वीराज चव्हाण बाहेर!

कृष्णा कारखाना निवडणूक : मोहितेंच्या 'मनोमिलन' प्रक्रियेतून पृथ्वीराज चव्हाण बाहेर!

Next
ठळक मुद्देसातारा व सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यात कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होत आहे. कारखान्याची सत्ता सध्या डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांच्या सहकार पॅनेलकडे आहे.

प्रमोद सुकरे

कऱ्हाड : कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांचे मनोमिलन व्हावे, त्यांनी एकत्रीत निवडणुकीला सामोरे जावे यासाठी मी खुप प्रयत्न केले. मात्र, त्याला यश आले नाही. आता मी या प्रक्रियेतून बाहेर पडत आहे. पुढचा निर्णय ज्याचा त्याने घ्यावा, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी व्यक्त केले. त्यामुळे आता मनोमिलनाची शक्यता धुसर झाली, असेच म्हणावे लागेल.

सातारा व सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यात कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होत आहे. कारखान्याची सत्ता सध्या डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांच्या सहकार पॅनेलकडे आहे. भोसले हे राजकीयदृष्ट्या भाजपवासी असल्यामुळे त्यांना रोखण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्य सहकारमंत्री विश्वजीत कदम, अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी पुढाकार घेत डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनाचा प्रयत्न चालविला होता. गेल्या चार ते पाच महिन्यात दोन माजी अध्यक्ष मोहितेंच्या मनोमिलनासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, कऱ्हाड येथे नेत्यांच्या उपस्थितीत सुमारे आठ ते दहा बैठका झाल्या. या दोघांच्यात ‘संगम’ व्हावा, म्हणून रविवारी रात्री कऱ्हाडातही एक बैठक झाली. पण या बैठकीतुनही समाधानकारक तोडगा न निघाल्याने पृथ्वीराज चव्हाण नाराज झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी मनोमिलनाच्या या चर्चेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी, तुमच्या निकटवर्तीयांनी कृष्णा कारखाना निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत, याकडे लक्ष वेधले असता, त्याबद्दल आता मी काही बोलणार नाही, असे चव्हाण यांनी सांगीतले. कारखाना निवडणुकीत तुमची नक्की काय भुमिका राहणार, याबाबत छेडले असता तेही त्यांनी स्पष्ट केले नाही. पण, पृथ्वीराज चव्हाणांनी या चर्चेतून माघार घेतल्याने संभाव्य मनोमिलनाची शक्यता धुसर झाली आहे, असेच म्हणावे लागेल. त्यातच डॉ. इंद्रजित मोहिते यांनी आपल्या रयत पॅनेलचा व अविनाश मोहिते यांनी संस्थापक पॅनेलचा स्वतंत्र प्रचारही सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळे कृष्णात तिरंगी लढतीची शक्यता वर्तविली जाऊ लागली आहे. अजुन अर्ज माघारीला १७ जुनपर्यंत मुदत आहे. त्यानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.
 

Web Title: Krishna factory election: Prithviraj Chavan out of Mohite's 'manomilan' process!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.