झोपेत असतानाच डोक्यात दगड घालून खून, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल; साताऱ्यातील पाटण तालुक्यामधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 18:32 IST2022-12-10T17:57:15+5:302022-12-10T18:32:23+5:30
खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

झोपेत असतानाच डोक्यात दगड घालून खून, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल; साताऱ्यातील पाटण तालुक्यामधील घटना
हणमंत यादव
चाफळ : झोपेत असतानाच डोक्यात दगड घालून वडाप व्यावसायिकाचा खून करण्यात आला. ही घटना पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील भैरेवाडी, डेरवण येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली. सीताराम बबन देसाई (वय ४५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिस खुन्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डेरवण ग्रामपंचायत अंतर्गत समावेश असणाऱ्या भैरेवाडी येथील सीताराम बबन देसाई हे चाफळ दाढोली मार्गावर खासगी प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करतात. शुक्रवारी रात्री ते झोपेत असतानाच अज्ञाताने त्यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
सीताराम देसाई यांचे भैरेवाडी येथे राहते घर आहे. तर गावाला लागूनच असणाऱ्या टेक नावाच्या शिवारात त्यांचे जनावरांचे शेड आहे. देसाई हे शुक्रवारी रात्री जेवण करून जनावरांच्या शेडकडे गेले होते. सकाळी ते घरी न परतल्याने घरचे लोक शेडकडे आले. त्यावेळी ते रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. देसाई यांच्याजवळ रक्ताने माखलेले दगड सापडल्याने दगडाने ठेचून त्यांचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेच्या ठिकाणी ठसे तज्ज्ञासह श्वानपथकाला पाचारण केले. या घटनेची चाफळ पोलिस दूरक्षेत्रात नोंद झाली आहे. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केल्यानंतर देसाई यांचा मृतदेह पाटण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई सिध्दनाथ शेडगे व मनोहर सुर्वे तपास करत आहेत.