Satara: शिरवळमधून अपहरण केलेल्या कामगाराची सुटका, आरोपींच्या अवघ्या सात तासांत मुसक्या आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 16:13 IST2025-09-24T16:12:27+5:302025-09-24T16:13:02+5:30
शिरवळ : शिरवळ येथील एका सर्व्हिस रोडवर जुनी दुचाकी चोरल्याच्या संशयावरून व आर्थिक व्यवहारातून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी वराह देखभाल ...

Satara: शिरवळमधून अपहरण केलेल्या कामगाराची सुटका, आरोपींच्या अवघ्या सात तासांत मुसक्या आवळल्या
शिरवळ : शिरवळ येथील एका सर्व्हिस रोडवर जुनी दुचाकी चोरल्याच्या संशयावरून व आर्थिक व्यवहारातून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी वराह देखभाल करणाऱ्या कामगाराला कारमधून अपहरण केले. पुणे जिल्ह्यात घेऊन गेलेल्या पाच आरोपींच्या मुसक्या शिरवळ पोलिसांनी अवघ्या सात तासांत आवळल्या. शिरवळ पोलिसांनी भरत लक्ष्मण वाघमारे (वय ३६, मूळ रा. माळेगाव नसरापूर, ता. भोर, सध्या रा. पळशी ता. खंडाळा) या कामगाराची सुटका करीत पाच अपहरणकर्त्यांना अटक केली आहे.
घटनास्थळ व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ येथील उद्योजक दत्तात्रय माने यांचे वराह पालनाचा व्यवसाय आहे. माने यांच्याकडे वराह देखभालसाठी भरत वाघमारे हा कामगार म्हणून कार्यरत आहे. दरम्यान, शनिवार दि. २० रोजी सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांच्या दरम्यान सातारा ते पुणे जाणाऱ्या रस्त्यावर शिरवळ हद्दीतील एका कॅन्टीनमधून वराहसाठी खाद्य आणण्यासाठी तीनचाकी टेम्पोमधून निघालेल्या भरत वाघमारे याला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अडवून एका कारमधून अपहरण केले. अशी फिर्याद शिरवळ पोलिस स्टेशनला दत्तात्रय माने यांनी दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फलटणचे पोलिस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे, पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे, सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले, कीर्ती म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके केली. अपहरण झालेला कामगार भरत वाघमारे व अपहरणकर्ते हे पुणे जिल्ह्यातील मुळशी लगत नांदगाव हद्दीत डोंगराळ भागात असल्याची माहिती मिळताच तत्काळ पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने शोधमोहीम राबविली.
अपहरण झालेला कामगार भरत वाघमारे याची सुटका करीत अपहरणकर्ते नंदकुमार चंद्रकांत शिंगटे-जाधव (वय ४२), प्रतीक चंद्रकांत शिंगटे-जाधव (२६, दोघे रा. खडकी ता. वाई), गणेश शिवाजी पांचगने (२७, रा. सारोळा, ता. जामखेड), युवराज जालिंदर गायकवाड (५२, रा. राजुरी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर), रमेश परसराम बहीर (३६, रा. नाव्हली ता. जामखेड) यांच्या मुसक्या मोठ्या शिताफीने आवळल्या. यावेळी संबंधितांना खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सहायक पोलिस निरीक्षक कीर्ती म्हस्के तपास करीत आहेत.