कऱ्हाडच्या वाहतूक शाखेला ‘क्रेन’ मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:40 IST2021-04-02T04:40:44+5:302021-04-02T04:40:44+5:30
कऱ्हाडसह मलकापूर शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढू लागली आहे. मात्र, अनेक ठिकाणी रस्ते अरुंद आहेत. त्यातच पार्कींगचा प्रश्न आ ...

कऱ्हाडच्या वाहतूक शाखेला ‘क्रेन’ मिळेना!
कऱ्हाडसह मलकापूर शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढू लागली आहे. मात्र, अनेक ठिकाणी रस्ते अरुंद आहेत. त्यातच पार्कींगचा प्रश्न आ वासून उभा आहे. कऱ्हाडात कोठेही पार्कींग झोन नाही. त्यामुळे वाहने पार्क कुठे करायची, असा प्रश्न पडतो. शहरातील मुख्य बाजारपेठेत पार्कींगची मोठी समस्या आहे. यावर तोडगा म्हणून सम-विषम पार्कींगचा पर्याय निवडण्यात आला आहे. मात्र, तरीही हा प्रश्न पूर्णपणे निकाली निघालेला नाही. सम-विषम पार्कींग असले तरी रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होतेच. त्यातच एखाद्याने नियमबाह्य पार्कींग केले तर कोंडीत आणखी भर पडते. ही परिस्थिती उद्भवू नये तसेच पार्कींगला शिस्त लागावी, यासाठी वाहतूक पोलीस क्रेनसह बाजारपेठेसह अन्य रस्त्यांवर फिरत असतात. नो पार्कींगमधील वाहनांवर त्यांच्याकडून कारवाई केली जाते. चालकाकडून दंड घेतला जातो. मात्र, सध्या अशी क्रेनच पोलिसांकडे नसल्यामुळे नो पार्कींगची कारवाई पूर्णपणे थंडावली असून बेशिस्त पार्कींग वाढले असल्याचे दिसून येत आहे.
- चौकट
एक क्रेन आली, दुसऱ्याच दिवशी गेली!
सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांनी क्रेनसाठी पाठपुरावा केला. त्यानंतर एक क्रेन उपलब्ध झाली. नारळ फोडून त्या क्रेनचे उद्घाटनही करण्यात आले. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ती क्रेन बंद झाली. आजअखेर ती क्रेन पोलिसांकडे फिरकलेलीच नाही. त्यामुळे पोलिसांना कारवाई करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
फोटो : ०१केआरडी०२
कॅप्शन : कऱ्हाडच्या वाहतूक पोलिसांकडे क्रेन उपलब्ध नसल्यामुळे बेशिस्त पार्कींगचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते.