Satara: आईनेच रचला मुलाच्या खुनाचा कट, दारू पाजून दगडाने ठेचले; प्रियकरासह चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 14:19 IST2025-02-01T14:19:23+5:302025-02-01T14:19:40+5:30

पोलिसांनी तातडीने गुन्ह्याचा तपास करून चोवीस तासांत आरोपींना ताब्यात घेऊन अटक केले

It was the mother who plotted the murder of the young son with the help of her lover in karad satara | Satara: आईनेच रचला मुलाच्या खुनाचा कट, दारू पाजून दगडाने ठेचले; प्रियकरासह चौघांना अटक

Satara: आईनेच रचला मुलाच्या खुनाचा कट, दारू पाजून दगडाने ठेचले; प्रियकरासह चौघांना अटक

कऱ्हाड : आईनेच प्रियकराच्या मदतीने तरुण मुलाच्या खुनाचा कट रचला. प्रियकराने दोन साथीदारांच्या मदतीने दगडाने ठेचून मुलाचा खून करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे संबंधित तरुणाचा जीव वाचला असून, याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आले आहे. कऱ्हाड तालुक्यातील वराडे येथे ही घटना घडली.

शोभा महादेव शेंडगे (वय ३८, रा. काटेपुरम चौक, पिंपळे गुरव, सांगवी, ता. हवेली, जि. पुणे), जयेंद्र गोरख जावळे (४०, रा. सांगवी, ता. हवेली. जि. पुणे) सिद्धार्थ विलास वाव्हळे (२५, रा. मातोश्रीनगर, वांगी रोड, परभणी), अकबर मेहबूब शेख (२५, रा. निकाळजे वस्ती, बाणेरगाव, बालेवाडी स्टेडियमजवळ, ता. हवेली) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत, तर खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या प्रशांत महादेव शेंडगे (२४, मूळ रा. शिवडे, ता. कऱ्हाड) याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वराडे हद्दीत सागवानाच्या शेतामध्ये बुधवारी रात्री प्रशांत शेंडगे हा युवक जखमी स्थितीत आढळून आला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. तसेच, पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, अरुण देवकर, सहायक निरीक्षक किरण भोसले, अशोक भापकर, रवींद्र भोरे, अमित बाबर, रोहित पारनेर, सत्यवान पाटील, विश्वास शिंगाडे यांच्यासह कर्मचाऱ्यांची चार पथके तयार करून या गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात करण्यात आली. 

पोलिसांनी माहिती घेतली असता, प्रशांत शेंडगे याच्या आईचे अनैतिक संबंध असल्यामुळे प्रशांत वारंवार वाद घालत होता. तो व्यसनाधीन असल्यामुळे आई शोभा हिने तिचा प्रियकर जयेंद्र जावळे याच्या मदतीने प्रशांतचा खून करण्याचा कट रचल्याचे तपासातून निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी चौघांना अटक केले आहे. याबाबतची नोंद तळबीड पोलिस ठाण्यात झाली आहे.

दारू पाजून दगडाने ठेचले

जयेंद्र जावळे याने त्याचे साथीदार सिद्धार्थ व्हावळे आणि अकबर शेख या दोघांना मदतीला घेऊन प्रशांतला रिक्षाने उंब्रजमधून वराडे येथील शेतात आणले. त्याठिकाणी त्याला दारू पाजली. तसेच, दगडाने ठेचून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. प्रशांतला जखमी अवस्थेत सोडून ते तेथून पसार झाले होते. पोलिसांनी तातडीने या गुन्ह्याचा तपास करून चोवीस तासांत चारही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केले.

Web Title: It was the mother who plotted the murder of the young son with the help of her lover in karad satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.