इस्रायली पाहुण्यांनी साताऱ्यातील संग्रहालयात अनुभवला शिवकाळ, गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती पाहून झाले अचंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 17:40 IST2025-09-01T17:40:17+5:302025-09-01T17:40:58+5:30
स्पेस एजन्सीच्या अधिकाऱ्यांची संग्रहालयाला भेट

इस्रायली पाहुण्यांनी साताऱ्यातील संग्रहालयात अनुभवला शिवकाळ, गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती पाहून झाले अचंबित
सातारा : महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयास रविवारी इस्रायली स्पेस एजन्सीच्या चेअरमन डॉ. सिम्रित मॅमन यांनी सदिच्छा भेट दिली. संग्रहालयातील तख्त दालन, शस्त्र दालन आणि नानी दालन यास भेट देऊन त्यांनी मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा जवळून अनुभवली.
यावेळी प्रोफेसर डॅन ब्लुमबर्ग, अर्थसाइट फाउंडेशनचे प्रमुख डॉ. शिरीष रावण आदी उपस्थित होते. या पाहुण्यांचे स्वागत संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी केले. त्यांनी या पाहुण्यांना गड- किल्ल्यांच्या प्रतिकृतींपासून ते शिवकाळातील दुर्मीळ शस्त्रास्त्रांपर्यंत प्रत्येक वस्तूची सखोल माहिती दिली. पाहुण्यांनी संग्रहालयातील विविध शस्त्रास्त्रांची पाहणी केली, तसेच १२ गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती पाहून ते अचंबित झाले. हा ऐतिहासिक वारसा अत्यंत उत्तम रीतीने जतन केला आहे, असे उद्गारही त्यांनी काढले.
डॉ. शिरीष रावण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची ओळख करून दिली. संग्रहालयाचे व्यवस्थापन आणि येथील ऐतिहासिक वस्तूंचे संवर्धन पाहून डॉ. सिम्रित मॅमन यांनी समाधान व्यक्त केले. या स्मरणीय भेटीची आठवण म्हणून प्रवीण शिंदे यांनी पाहुण्यांना ‘शिवशस्त्रशौर्य गाथा’ हे पुस्तक भेट दिले. या भेटीने छत्रपतींच्या इतिहासाची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचली आहे.