घडतंय बिघडतंय: 'राष्ट्रवादी'चे एकीकरण ही कार्यकर्त्यांची की पवारांचीच भावना!
By प्रमोद सुकरे | Updated: May 10, 2025 19:35 IST2025-05-10T19:32:50+5:302025-05-10T19:35:12+5:30
थोरल्या पवारांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?

घडतंय बिघडतंय: 'राष्ट्रवादी'चे एकीकरण ही कार्यकर्त्यांची की पवारांचीच भावना!
प्रमोद सुकरे
कराड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर थोरल्या पवारांनी पुन्हा 'तुतारी' फुंकली. पण त्या 'तुतारी'चा आवाज आता मर्यादितच राहिला आहे. धाकल्या पवारांनी 'घड्याळा'ला चावी दिली असली तरी त्याला देखील निश्चित मर्यादा आहेत. त्यातूनच एक करू 'राष्ट्रवादी पुन्हा' हा सुर काही दिवसांपासून आळविला जात आहे .आता या भावना नेमक्या कार्यकर्त्यांच्या की पवारांच्याच आहेत याबाबतच्या उलट सुलट चर्चा राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू आहेत.
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र म्हणून शरद पवारांना ओळखले जाते. त्यांनीच सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यावरून काँग्रेसशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी त्यांच्यासोबत सर्वात पुढे सातारा जिल्हा होता. म्हणून तर सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून तेव्हा ओळखला जात होता. पण आता सातारा जिल्ह्यात कोणत्याच राष्ट्रवादीची ती ताकद राहिलेली नाही ही वस्तुस्थिती आहे.
राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर अजित पवारांनी हा पक्ष ताब्यात घेत आपली पक्षावरील पकड दाखवून दिली. तर थोरल्या पवारांना उतारत्या वयात पुन्हा 'तुतारी' फुंकावी लागली. त्यांनी तुतारी फुंकत अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. लोकसभेला तुतारी वाजली खरी पण विधानसभेला त्या तुतारीचा आवाज क्षिण झाला. त्यामुळे तुतारी हातात घेतलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्यातील अस्वस्थता आता लपून राहिलेली नाही.
त्यातच आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्र यावे असा सूर सध्या आळवला जात आहे. दोन दिवसांपूर्वी तर दस्तुरखुद्द 'थोरल्या' पवारांनी एकत्रीकरणाचा निर्णय खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेतील असे सुतोवाच केल्याने एकत्रिकरणाच्या चर्चा आता भलत्यात वाढल्या आहेत.आता या चर्चा चर्चाच राहणार की त्याला मूहुर्त स्वरूप येणार? हे पाहण्यासाठी थोडे थांबावे लागणार आहे.
राष्ट्रवादी कार्यकर्ते सुखावलेले दिसतात
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाच्या साखरपुड्याचा कार्यक्रम काही महिन्यांपूर्वी पार पडला. या कार्यक्रमाला शरद पवारांसह संपूर्ण पवार कुटुंबीय मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. त्याचवेळी राष्ट्रवादी प्रेमींच्या मनात जरा शंकेची पाल चुकचुकली.
- त्यानंतर सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात चुलते- पुतणे खुर्चीला खुर्ची लावून बसलेले अन कानगोष्टी करतानाही अनेकांनी पाहिले आहे.
- आता तर शरद पवारांनीच केलेल्या सुतोवाचामुळे सध्या तरी राष्ट्रवादी कार्यकर्ते सुखावलेले दिसत आहेत.
..तर राष्ट्रवादीला गत वैभव प्राप्त होईल
सातारा जिल्ह्यात पवार परिवारावर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र झाल्या तर जिल्ह्यात राष्ट्रवादीला पुन्हा गतवैभव प्राप्त होऊ शकते अशा भावना अनेक राष्ट्रवादीचे पदाधिकारी खाजगीत बोलून दाखवत आहेत. शुक्रवारी देखील पवार सातारा दौऱ्यावर असताना याच भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.