Satara: राष्ट्रध्वजाचा अपमान; केसुर्डीतील कंपनी व्यवस्थापकांसह दोघांना न्यायालयाने ठरवले दोषी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 18:28 IST2024-10-01T18:22:57+5:302024-10-01T18:28:03+5:30
मुराद पटेल शिरवळ : खंडाळा तालुक्यातील केसुर्डी येथील थरमँक्स बँबकाँन्स विलकाँक्स या आंतरराष्ट्रीय कंपनीमधील एका कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी ...

Satara: राष्ट्रध्वजाचा अपमान; केसुर्डीतील कंपनी व्यवस्थापकांसह दोघांना न्यायालयाने ठरवले दोषी
मुराद पटेल
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील केसुर्डी येथील थरमँक्स बँबकाँन्स विलकाँक्स या आंतरराष्ट्रीय कंपनीमधील एका कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकासह दोघांना खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले. तर प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आठ दिवस साधी कैद सुनावली.
केसुर्डी येथे थरमँक्स बँबकाँन्स विलकाँक्स ही आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. ३ मार्च २०१५ रोजी एका कार्यक्रमात अमेरिकेच्या झेंड्यासहीत भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला. तर रेडियमने कंपनीची माहिती दर्शविणारा दिशादर्शक फलक लावून राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी खंडाळा पोलिस स्टेशनला ४ जून २०१५ रोजी तक्रारी अर्जावरुन कंपनीचे व्यवस्थापक मोहन शंकर पाटील (वय ७१, रा.पिंपरी,पुणे), सुहास पुंडलीक गर्दे (वय ५४, रा. कर्वेनगर, कोथरुड, पुणे) यांच्याविरुध्द राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१ चे कलम २ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक संभाजी म्हेञे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक पोपट कदम यांनी तपास करीत २१ आँक्टोंबर २०१५ रोजी खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये दोषारोपपञ दाखल केले होते.
याप्रकरणी न्यायाधीश एस.जे.कातकर यांच्यासमोर सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील स्मिता चौधरी, सरकारी सहाय्यक अभियोक्ता एस.डी. भोसले यांनी आठ साक्षिदार तपासले. सरकारी अभियोक्ता एस.डी.भोसले यांनी केलेला युक्तिवाद, प्रत्यक्षदर्शी पुरावा, साक्षिदार व कागदपञ ग्राह्य मानत कंपनी व्यवस्थापक मोहन पाटील, सुहास गर्दे यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम २७१ फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २४८ (२) अन्वये राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम २ अंतर्गत दोषी ठरवत प्रत्येकी पन्नास हजार रुपये असा एक लाख रुपये दंड व दंडाची रक्कम न भरल्यास प्रत्येकी आठ दिवसांची साधी कैद सुनावली.
सरकारी पक्षातर्फे वकील एस.डी.भोसले यांनी कामकाज पहिले. तर त्यांना प्रॉसिक्युशन स्कॉडच्या पोलीस अंमलदार शिवशंकर शेळके, पोलीस अंमलदार मंगल हेंद्रे, पोलीस अंमलदार पूनम गायकवाड यांनी सहकार्य केले.