प्रमोद सुकरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कऱ्हाड: उद्योगपती दिवंगत डॉ. नीलकंठराव कल्याणी यांची कन्या सुगंधा कल्याणी (हिरेमठ) यांनी वडिलोपार्जित मालमत्तेबाबत कायदेशीर लढा सुरू केला आहे. त्यांनी वडिलांनी मालमत्तेसंदर्भात कऱ्हाडमधील वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्काच्या खटल्यात गुरुवारी येथील दिवाणी न्यायालयात न्यायाधीश आरएस पाटील-भोसले यांच्याकडे अर्ज दाखल केला. यापूर्वीच नीलकंठराव कल्याणी यांनी २०१२ मध्ये दाखल केलेल्या खटल्यात वारसदार म्हणून सामील करण्याचा तो अर्ज आहे. न्यायालयाने तो अर्ज दाखल करून घेतला आहे. त्याबाबतची पुढील सुनावणी ३१ जुलैला होणार आहे, अशी माहिती सुगंधा हिरेमठ यांच्या वकील सुखदा वागळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी सुगंधा कल्याणी (हिरेमठ) यांची उपस्थिती होती.
अॅड. वागळे म्हणाल्या, दिवंगत डॉ. कल्याणी २००८ साली आजारी होते. त्या काळात त्यांनी कऱ्हाडमधील वडिलोपार्जित मालमत्तेच्या देखरेखेसाठी त्यांचा लहान मुलगा गौरीशंकर कल्याणी आणि त्यांच्या कुटुंबाला पॉवर ऑफ अॅटर्नी (कुलमुखत्यारपत्र) देण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात तो दस्तऐवज करताना त्यात दान आणि मालमत्ता हस्तांतरणाचा अधिकार जोडण्यात आला. इतकेच नव्हे, गौरीशंकर यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्याचेही नाव त्या (पीओए) मध्ये समाविष्ट केले गेले. त्या आधारे कऱ्हाडच्या मालमत्ता गौरीशंकर कल्याणी यांच्या नावे हस्तांतरित झाल्या.
सदरचा प्रकार २००८ मध्ये घडल्यानंतर नीलकंठराव कल्याणी यांना त्याचेवळी फसवणुकीची कल्पना येताच त्यांनी कुलमुखत्यारपत्र रद्द केले. त्याविरोधात २०१२ मध्ये न्यायालयात धाव घेतली. मात्र, २०१३ मध्ये कल्याणी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर खटले प्रलंबित राहिले. या सगळ्या घडामोडीबाबत त्यांची मुलगी सुगंधा कल्याणी ( हिरेमठ) यांना काहीही माहिती नव्हती. नुकतीच त्याबाबत माहिती डॉ. कल्याणी यांची कन्या सुगंधा हिरेमठ यांना मिळाली. माहिती मिळाल्यावर त्यांनी वडीलांच्या खटल्यात स्वतःचा वारस म्हणून समावेश करून घेण्याचा अर्ज दिला आहे. २०१२ च्या खटल्यात पक्षकार म्हणून समाविष्ट होण्याची विनंती करणारा तो अर्ज होता. त्यानुसार आरजेडी अँड पार्टनर्स या आमच्या कायदेशीर सल्लागारांच्या संस्थेच्या मदतीने अर्ज दाखल करून घेण्यात आला. त्या अर्जावर न्यायालयाने पुढील सुनावणी ३१ जुलै रोजी ठेवली आहे.असेही अँड वागळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.