कास येथे भारतातील पहिला लघु जलविद्युत प्रकल्प, सातारा शहराला मिळाली तब्बल ३२ वर्षे वीज, त्याकाळी किती आला खर्च..जाणून घ्या
By सचिन काकडे | Updated: January 27, 2025 14:23 IST2025-01-27T14:23:01+5:302025-01-27T14:23:18+5:30
सत्तावीस किलोमीटर अंतरावरून नैसर्गिक उताराने येणाऱ्या पाण्यावर वीज निर्मिती प्रकल्प साकारता येईल असा विचारही कोणी केला नव्हता; परंतु

कास येथे भारतातील पहिला लघु जलविद्युत प्रकल्प, सातारा शहराला मिळाली तब्बल ३२ वर्षे वीज, त्याकाळी किती आला खर्च..जाणून घ्या
सचिन काकडे
सातारा : सत्तावीस किलोमीटर अंतरावरून नैसर्गिक उताराने येणाऱ्या कास तलावाच्या पाण्यावर वीज निर्मिती प्रकल्प साकारता येईल असा विचारही कोणी केला नव्हता; परंतु सातारा इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीने ही योजना आखली अन् ती साकारलीही. कास रस्त्यालगत असलेल्या पाॅवर हाऊस येथे भारतातील पहिला लघु जलविद्युत प्रकल्प उभा राहिला. या प्रकल्पातून शहराला तब्बल ३२ वर्षे वीज पुरवठा सुरू होता.
१९३३ साली सातारा इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीची स्थापना झाली. या कंपनीने सांबरवाडीपासून पाॅवर हाऊसपर्यंत नऊ इंच व्यासाची लोखंडी पाईपलाईन आणली. ५३८ फूट उंचीवर येणाऱ्या जलवाहिनीतील पाण्यावर पाॅवर हाऊस येथे वीज निर्मिती होऊ लागली. या योजनेसाठी त्याकाळी १ लाख ८४ हजार रुपये इतका खर्च आला होता. ७५ किलोवॅट वीज निर्मिती क्षमता असलेला हा भारतातील पहिला लघु जलविद्युत प्रकल्प होता.
१९३५ ते १९६७ असा ३२ वर्षे या प्रकल्पाने शहराचा पश्चिम भाग प्रकाशमान केला. त्यावेळी कंपनीचे कार्यालय मोती चौकातील दिवाण महाजन वाड्यात होते. कालौघात ही योजना बंद पडली असली तरी सातारा नगरपालिकेकडून या ठिकाणी नव्याने दीड मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प उभा केला जाणार आहे.
सदर बझारला १०० वर्षे मिळाले पाणी
१८९२ साली कासचे पाणी बोगद्यापासून पोवई नाक्यावरील कॅम्प वॉटर वर्क्स येथे जलवाहिनी टाकून आणण्यात आले. सदर बझार भागाला या ठिकाणाहून १९९२ सालापर्यंत तब्बल १०० वर्षे पाणीपुरवठा केला जात होता. रस्ते विकास, बांधकामे, खापरी नळाची मोडतोड अशा अनेक कारणांमुळे हा पाणीपुरवठा इतिहास जमा झाला.
खापरी नळ इतिहास जमा
सुरुवातीच्या काळात सातारा शहराची तहान भागवण्यासाठी यवतेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस तलावाची उभारणी झाली. या तलावातून येणारे पाणी तसेच वाटेतील झऱ्याचे पाणी एकत्र करून खापरी नळाने ते साताऱ्यात आणले गेले. हे खापरी नळही आता इतिहास जमा झाले असून, यवतेश्वर घाटात हे खापरी नळ आजही नजरेस पडतात.