Satara Crime: सावरी ड्रग्ज प्रकरणात ‘सस्पेन्स’; मुंबई पोलिसांकडून कोऱ्या कागदावर पंचांच्या सह्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 19:06 IST2025-12-19T19:05:43+5:302025-12-19T19:06:41+5:30
ग्रामस्थांनी उलगडला ‘तो’ घटनाक्रम

Satara Crime: सावरी ड्रग्ज प्रकरणात ‘सस्पेन्स’; मुंबई पोलिसांकडून कोऱ्या कागदावर पंचांच्या सह्या!
सातारा : सातारा जिल्ह्यातील सावरी (ता. जावळी) येथील ११५ कोटींच्या एमडी ड्रग्ज प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली असतानाच, आता या कारवाईतील धक्कादायक आणि अनाकलनीय माहिती समोर येत आहे. ‘लोकमत टीम’ने घटनास्थळी ग्राऊंड रिपोर्ट करून सावरी ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी मुंबईपोलिसांनी ग्रामस्थांसमोर पंचांच्या को-या कागदावर सह्या घेतल्याचे गुपीत उलगडले.
‘मुंबईपोलिसांकडून ही कारवाई शनिवारी (दि. १३) पहाटे तीन वाजता करण्यात आली. मात्र, आम्हा ग्रामस्थांना शनिवारी सकाळी आठ वाजता या कारवाईची माहिती देण्यात आली. पहाटेपासून सुरू झालेल्या कारवाईवेळी आरोपींना रसद पुरविणारा ओमकार तुकाराम डिघे घटनास्थळी उपस्थित होता. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले होते. त्याच्या हातात बेडया घालून त्याला गाडीत बसविलेलेही ग्रामस्थांनी पाहिले. मात्र, काही वेळाने त्याला का सोडून देण्यात आले? हेच समजले नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मुंबई पोलिसांनी कारवाईनंतर घटनास्थळाचा पंचनामा केला. मुद्देमाल जप्त केला. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे उपस्थित ग्रामस्थांपैकी दोघा पंचांच्या सह्या आधी पंचनाम्याच्या अहवालावर व नंतर चक्क कोऱ्या कागदावर घेण्यात आल्या. त्यावेळी नकार देणा-यांना ‘अंधार असल्याने आता लिहिता येणार नाही, तुम्ही फक्त सह्या करा, तुम्हाला अडचण येणार नाही’ असे अजब उत्तर पोलिसांनी दिल्याचे ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कोण आहे ओमकार डिघे?
या प्रकरणात सावरी गावातील ओमकार डिघे या व्यक्तीचा थेट सहभाग असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला. मात्र, हे प्रकरण उघडकीस आल्यापासून तो फरार आहे. ओमकार डिघे हा पूर्वीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याला याआधी गावकऱ्यांनी वेगवेगळ्या कारणांनी ‘धडा’ही शिकवला होता. ड्रग्ज फॅक्टरी चालवणाऱ्यांना रसद पुरवणे आणि खानपानाची सोय करण्याची जबाबदारी त्याच्यावरच असावी. कारण त्या परिसरात रोज पार्टी करताना दिसत होता. तसेच, तोदेखील नशेच्या आहारी गेला होता, अशी माहिती ग्रामस्थांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.
मेढा पोलिसांकडून पेट्रोलिंग
सावरी येथील ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश झाल्यापासून संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या कारवाईनंतर परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, येथील हालचालींवर बारीक लक्ष ठेवता यावे, यासाठी मेढा पोलिसांनी आता कंबर कसली आहे. ‘त्या’ फॅक्टरीच्या परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मेढा पोलिसांच्या विशेष पथकाद्वारे गस्त सुरू आहे.
काही प्रश्न अनुत्तरीतच...
सावरी गावात मुंबई क्राईम ब्रँचने केलेल्या कारवाईनंतरही काही प्रश्न अनुत्तरीत आहेत. दुर्गम गावात निर्जन ठिकाणी वन्यजीवांचा धोका असूनही कडाक्याच्या थंडीत रात्रभर तीनजण वास्तव्य कसे करत होते? याच्या कोणत्या खुणा त्याठिकाणी आढळल्या? संशयित त्याचठिकाणी वास्तव्यास होते की अन्य ठिकाणी? या प्रश्नांची उकल होणे गरजेचे आहे.