Karad Municipal Council Election Results 2025: कराडमध्ये भाजपसह काँग्रेसला मोठा धक्का; यशवंत, लोकशाही आघाडीची बाजी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 17:39 IST2025-12-22T17:37:26+5:302025-12-22T17:39:49+5:30
Karad Nagar Palika Election Results 2025: लोकशाही आघाडीला सर्वांत जास्त जागा, काँग्रेसला खातेही खोलता आलेले नाही

Karad Municipal Council Election Results 2025: कराडमध्ये भाजपसह काँग्रेसला मोठा धक्का; यशवंत, लोकशाही आघाडीची बाजी!
कराड : विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच नगरपालिका निवडणुका झाल्या. यात कराड पालिका निवडणुकीत भाजपसह काँग्रेसला मोठा धक्का बसला. तर यशवंत, लोकशाही आघाडीचे राजेंद्रसिंह यादव यांनी दोन्ही राष्ट्रवादीला सोबत घेत केलेली आघाडी यशस्वी ठरली आहे. यादवांनी नगराध्यक्षपदावर तर बाजी मारलीच; पण त्यांच्या यशवंत, लोकशाही आघाडीचे तब्बल १९ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपचे ११ नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेसला मात्र खातेही खोलता आलेले नाही. त्यामुळे भाजपचे आमदार अतुल भोसले यांच्यासह काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
खरंतर कराड नगरपालिकेत अपवाद वगळता आजवर आघाड्यांचेच राजकारण पाहायला मिळाले होते. यंदा मात्र विद्यमान आमदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनी स्वबळाचा नारा देत सर्व उमेदवार ‘कमळा’च्या चिन्हावर रिंगणात उतरवले. तीच ‘री’ ओढत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही नगराध्यक्ष पदासह १३ ठिकाणी ‘हाता’च्या चिन्हावर नगरसेवक पदासाठी उमेदवार दिले.
वाचा : साताऱ्यात भाजप ‘सिकंदर’ तर अपक्ष उमेदवार ‘धुरंधर’!, पालिकेत शिंदेसेनेचीही झाली एंट्री
मात्र, यशवंत, लोकशाही आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे दावेदार राजेंद्रसिंह यादव यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अनुक्रमे बाळासाहेब पाटील व ॲड. उदयसिंह पाटील यांना सोबत घेत यशवंत, लोकशाही आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. आता निकालानंतर त्यांचा हा निर्णय फायद्याचा ठरल्याचे पाहायला मिळत आहे.
जातीय समीकरणे ठरली महत्त्वाची...
कराडला २५ वर्षांनंतर नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले होते. त्यामुळे सगळ्यांकडेच इच्छुकांची संख्या वाढली होती. भाजपने तर इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. उमेदवार निश्चित होताना माजी उपनगराध्यक्ष विनायक पावस्कर यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर ते ओबीसी असल्याचा मुद्दा विरोधकांनी पुढे आणला. पालिकेचे राजकारण जातीय पातळीवर पोहोचले. परिणामी, मराठा क्रांती मोर्चा सुप्तपणे सक्रिय झाला. त्याचा परिणाम निकालात झाल्याचे बोलले जातेय.
काँग्रेसपेक्षा अपक्ष उमेदवार भारी!
काँग्रेसनेही ओबीसी कार्ड बाहेर काढत झाकीर पठाण यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली, पण त्यांना फक्त २,३०९ मते पडली आहेत, तर अपक्ष लढणाऱ्या रणजित पाटील यांना ६,६५१ मते पडली आहेत. त्यामुळे निकालानंतर काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा अपक्ष उमेदवारच भारी ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे.
वडील हरले; पण मुलगा जिंकला!
नगराध्यक्षपदासाठी विनायक पावसकर, तर त्यांचा मुलगा अजय पावसकर हा नगरसेवक पदासाठी प्रभाग ७ मधून उभा होता. नगराध्यक्षपदाचा निवडणुकीत विनायक पावस्कर यांचा पराभव झाला असला तरी मुलगा अजय पावसकर यांनी मात्र विजय संपादन केला आहे.
वडील जिंकले अन् मुलगा हरला!
माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार हे प्रभाग ६ मधून, तर त्यांचा मुलगा शाहरुख शिकलगार हा प्रभाग १२ मधून निवडणूक लढवत होता, पण निवडणुकीत वडील जिंकले अन मुलगा हरला अशी परिस्थिती पाहायला मिळाली.
आता भाऊ-भाऊ एकाच सभागृहात!
यशवंत, लोकशाही आघाडीच्या माध्यमातून राजेंद्रसिंह यादव थेट नगराध्यक्षपदासाठी, तर त्यांचे बंधू विजयसिंह यादव प्रभाग १२ मधून नगरसेवक पदासाठी रिंगणात उतरले होते. हे दोन्ही भाऊ विजयी झाल्याने आता ते एकाच सभागृहात दिसणार आहेत.
एका अपक्षाची ‘टोपली’ मतांनी भरली !
भाजपच्या युवा मोर्चाचे पदाधिकारी सुदर्शन पाटसकर यांना उमेदवारीने हुलकावणी दिली. त्यामुळे त्यांनी पत्नी ‘तेजश्री’ यांना प्रभाग ७ मधून अपक्ष म्हणून रिंगणात उतरवले. निकालानंतर त्यांचीच ‘टोपली’ सर्वाधिक मतांनी भरली. त्यामुळे त्याचीही चर्चा शहरभर सुरू आहे.