कोयना पाणीसाठा १०० टीएमसीकडे, सहा दरवाजे ५ फुटांनी उघडले; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 21:10 IST2025-08-18T21:09:18+5:302025-08-18T21:10:02+5:30

सहा दरवाजे पाच फुटांवर, ३५ हजार क्यूसेक विसर्ग, धोम, वीर अन् कण्हेर धरणातूनही पाणी सोडले; नद्यांच्या पातळीत वाढ   

In Satara Koyna Dam water storage nears 100 TMC, six gates opened by 5 feet; Water level of rivers increases | कोयना पाणीसाठा १०० टीएमसीकडे, सहा दरवाजे ५ फुटांनी उघडले; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

कोयना पाणीसाठा १०० टीएमसीकडे, सहा दरवाजे ५ फुटांनी उघडले; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

नितीन काळेल

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने कोयना धरणाच्या पाणीसाठ्याने १०० टीएमसीकडे वाटचाल सुरू केली आहे. यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सोमवारी रात्री सहा दरवाजे पाच फुटांनी उचलून ३३ हजार तर पायथा वीजगृहातून २ हजार १०० असा एकूण ३५ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच धोम, वीर आणि कण्हेर धरणातूनही विसर्ग वाढविण्यात आल्याने नद्यांच्या पाणीपातळी वाढ झालेली आहे.

जिल्ह्यात १५ आॅगस्टनंतर पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. पूर्व भागात पावसाची रिपरिप असलीतरी पश्चिमेकडे मात्र मुसळधार सुरू आहे. तसेच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, कोयना आणि उरमोडी या प्रमुख धरण पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस पडतोय. यामुळे धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणी आवक होत आहे. ही सर्वच धरणे ९० ते ९९ टक्क्यांपर्यंत भरलेली आहेत. पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्गातही सतत वाढ होत आहे.

कोयना धरणाच्या दरवाजातून रविवारपासून पाणी सोडण्यात येत आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातच धरणात आवक वाढल्याने सोमवारी दुपारी चार वाजता सहा दरवाजे दीडवरुन तीन फुटापर्यंत उचलून विसर्ग सुरू केला. त्यानंतर आवक वाढल्याने रात्री आठ वाजता दरवाजे पाच फुटापर्यंत वर घेण्यात आले. त्यातून ३३ हजार क्यूसेक आणि पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्यूसेक पाणी सोडले जात आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. सायंकाळी पाच वाजता कोयना धरणात ४५ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात सुमारे ९७ टीएमसी साठा झालेला. ९२ टक्के धरण भरले आहे.

अनेक पूल पाण्याखाली जाणार; सतर्कतेचा इशारा...
सातारा तालुक्यातील कण्हेर धरणातूनही विसर्ग वाढविण्यात आला आहे. सायंकाळी ४ हजार २०० क्यूसेक विसर्ग सुरू होता. त्यानंतरही वाढ करण्याचे नियोजन होते. यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने काही पूल पाण्याखाली जाणार आहेत. तर वीर धरणातून २२ हजार क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याने नीरा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धोम धरणातूही विसर्ग वाढणार असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. यामुळे वाई आणि सातारा तालुक्यातील काही पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

Web Title: In Satara Koyna Dam water storage nears 100 TMC, six gates opened by 5 feet; Water level of rivers increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.