Satara Politics- घडतंय बिघडतंय: 'अतुलबाबां'चा चिमटा, 'उदयदादां'ची चुप्पी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 12:10 IST2025-04-16T12:08:05+5:302025-04-16T12:10:10+5:30
कार्यकर्त्यांच्यात रंगताहेत खुमासदार चर्चा

Satara Politics- घडतंय बिघडतंय: 'अतुलबाबां'चा चिमटा, 'उदयदादां'ची चुप्पी!
प्रमोद सुकरे
कऱ्हाड: नुकत्याच झालेल्या सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीदरम्यान कराड दक्षिणचे आमदार डॉ.अतुल भोसले यांना सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीतील भूमिके विषयी माध्यमांनी छेडले. तेव्हा मी काही त्या कारखान्याचा सभासद नाही असे सांगतानाच 'मला किंगमेकर व्हायची हौस नाही' असा चिमटा त्यांनी नाव न घेता ऍड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांना काढला होता. पण आता निकाल लागून विजयाचा गुलाल खाली बसला तरी देखील उदयसिंह पाटीलांनी मात्र त्यावर चुप्पी बाळगली आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या या चुप्पीची सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे.
सह्याद्री कारखान्याच्या निवडणूकीत तिरंगी लढतीत बाळासाहेब पाटील यांच्याच पॅनेलने बाजी मारली आहे. पण आता या निवडणुकीदरम्यान घडलेल्या किस्स्यांच्या खुमासदार चर्चा सुरू आहेत. त्यापैकी एक किस्सा म्हणजे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी एड. उदयसिंह पाटील यांना काढलेला चिमटा होय. विशेष म्हणजे एड.पाटील यांनी याबाबत चुप्पीच बाळगली आहे. खरंतर एड. उदयसिंह पाटील- उंडाळकर व आमदार डॉ. अतुल भोसले- रेठरेकर यांच्या वडीलधाऱ्यांच्यात नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले होते. उंडाळकर भोसलेंना कृष्णा कारखान्याला तर भोसले उंडाळकरांना विधानसभेला मदत करत राहिले. मात्र अतुल भोसलेंनीच विधानसभेला शड्डू ठोकल्यानंतर त्यांच्यात वितुष्ट आले.आता तर त्यात अंतर वाढतच चालले आहे.
असाच एक पैरा कराड उत्तरेत होता. तो म्हणजे पी.डी. पाटील व विलासराव पाटील- उंडाळकर यांच्यात. कराड नगरपालिका, सह्याद्री साखर कारखाना या निवडणुकांना उंडाळकरांनी मदत करायची आणि बाजार समिती, जिल्हा बँक यांना पी डी पाटलांनी मदत करायची. पण बाळासाहेब पाटील सहकार मंत्री झाल्यावर त्यांना जिल्हा बँकेत विकास सोसायटी गटातून निवडून जाण्याची आस लागली. अन गत निवडणुकीत अड. उदयसिंह पाटील आणि बाळासाहेब पाटील दोघे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. त्यावेळी डॉ. अतुल भोसलेंनी अचूक संधी साधत बाळासाहेब पाटलांना मदतीचा हात दिला आणि कराड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली.असो
आता डॉ. अतुल भोसले कराड दक्षिणचे आमदार आहेत तर एड. उदयसिंह पाटील हे त्यांचे विरोधक आहेत. नुकत्याच झालेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ऍड. पाटील यांनी कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या पनेलला मदत करण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांची छबी त्यांच्या फ्लेक्सवर झळकत होती तर डॉ. भोसलेंनी स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. पण त्यांची छबी बाळासाहेब पाटील यांच्या फ्लेक्सवर होती. त्यावरून माध्यमांनी त्यांना छेडले असता त्यांनी मी कारखान्याचा सभासद नाही अन मला 'किंगमेकर होण्याची हौस नाही' असा चिमटा काढला होता. तो चर्चेचा बनला आहे. पण त्यावर ऍड. उदयसिंह पाटीलांनी अद्याप बाळगलेली चुप्पी देखील तितकीच चर्चेची ठरली आहे बरं!
कराड तालुक्याच्या राजकारणात दिवंगत विलासराव पाटील उंडाळकर यांचा अनेक वर्ष चांगलाच प्रभाव राहिला होता. कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत तर जिकडे उंडाळकर तिकडे सत्ता असे समीकरण अनेक वर्ष राहिले होते. तर पाटण व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात त्यांचा करिष्मा दिसायचा. त्यावेळी किंगमेकर म्हणून त्यांचे नाव आवर्जून घेतले जायचे. पण आता काळ बदलला आहे. म्हणून तर भोसलेंनी नाव न घेता उदयसिंह पाटलांना हा चिमटा काढला आहे. आता बघूया उंडाळकर यावर नक्की कधी आणि काय उत्तर देणार ते..