Satara Crime: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पती पोलिस ठाण्यात हजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 14:16 IST2025-09-18T14:16:03+5:302025-09-18T14:16:16+5:30
डोक्यात लोखंडी गज मारून निर्घृण खून

Satara Crime: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पती पोलिस ठाण्यात हजर
पुसेगाव : कटगुण, ता. खटाव येथील गोसावी वस्तीवरील पिंकी विनोद जाधव (वय २१ ) हिचा पतीने चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात लोखंडी गज मारून निर्घृण खून केला. त्यानंतर पती स्वत:हून पुसेगाव पोलिस ठाण्यात हजर झाला. ही धक्कादायक घटना बुधवारी घडली.
विनोद विजय जाधव (वय २६) असे पोलिसांनी अटक केलेल्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी विनोद जाधव हा स्वतःहून पुसेगाव पोलिस ठाण्यात हजर झाला. ‘काही वेळापूर्वी मी पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून तिच्या डोक्यात लोखंडी गज (रॉड) मारला असून ती राहते घराजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे, असे पोलिसांना त्याने सांगितले.
या घटनेनंतर सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमण व कर्मचारी त्या ठिकाणी तत्काळ पोहोचले. तेव्हा त्याची पत्नी पिंकी जाधव ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पोलिसांना दिसली. त्यांच्या नातेवाइकांच्या मदतीने पोलिसांनी तिला उपचारासाठी पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच ती मृत झाल्याचे घोषित केले.
मृत पिंकी जाधव हिला लहान तीन अपत्य असून या घटनेमुळे कटगुण व पुसेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आरोपी पती विनोद जाधव याच्याविरुद्ध पुसेगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.