सातारा जिल्ह्यात अवैध शंभर पिस्टल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची दीड वर्षातील कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 12:22 IST2024-12-05T12:22:27+5:302024-12-05T12:22:49+5:30
अवैध तस्करी रोखण्यात यश

सातारा जिल्ह्यात अवैध शंभर पिस्टल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची दीड वर्षातील कारवाई
सातारा : अवैध मार्गाने शस्त्रास्त्रांची होणारी तस्करी रोखण्यात पोलिसांना यश आले असून, गेल्या दीड वर्षात तब्बल १०२ देशी बनावटीचे पिस्टल, ४ बाराबोअर बंदुका, २ रायफल, २२९ काडतुसे व ३८३ रिकाम्या पुंगळ्या, ४ मॅगझीन असा मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी गुन्हेगारांकडून हस्तगत केला. गुन्हे उघडकीस आणण्यात तरबेज असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेला शस्त्रांची अवैध तस्करी रोखण्यात यश आले आहे.
शस्त्राचा परवाना घेताना अनेक नियम व अटी, शर्ती असल्यामुळे सहजासहजी परवाना कोणाला मिळत नाही. त्यामुळे अनेकजण अवैध मार्गाने शस्त्र खरेदी करतात. विशेषत: यामध्ये गुन्हेगारी क्षेत्रात असलेल्यांकडूनच पिस्टलसारखी घातक शस्त्रे स्वत:जवळ ठेवली जातात. ही शस्त्रे उत्तर प्रदेश, बिहार राज्यातून सातारा जिल्ह्यात अनेकदा आली आहेत. तेथील राज्यामध्ये तीस ते पस्तीस हजारांना मिळणारे शस्त्र साताऱ्यात ६५ ते ७० हजारांपर्यंत अवैध मार्गाने विकले जात होते. सातारा जिल्ह्यात होणारी पिस्टलची ही तस्करी स्थानिक गुन्हे शाखेने रोखण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात केली आहेत. गुन्हेगारांकडून विक्रीसाठी पिस्टल साताऱ्यात आणताच सापळा रचून गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली.
गेल्या दोन ते दीड वर्षांपासून एलसीबीकडून सातत्याने अवैध तस्करी रोखण्यासाठी कारवाया केल्या आहेत. सातारा, कऱ्हाड, फलटण, शिरवळ, खंडाळा, वाई या तालुक्यांत सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या आहेत. एवढ्या माेठ्या प्रमाणात कारवाया करून गुन्हेगारांचे शस्त्रास्त्रांची तस्करी जाळे पोलिसांनी उद्ध्वस्त करून टाकले आहे. एवढेच नव्हे, तर शस्त्रांची खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले. अवैध तस्करीच्या मुळाशी पोलिस गेल्याने शंभरपेक्षा जास्त पिस्टल पोलिसांच्या हाती लागले.
एलसीबीच्या टीमने गुन्हेगारांवर सतत वाॅच ठेवला. पिस्टल कोठून आणली जातात, याची माहिती ठेवली. वारंवार खबऱ्यांना सतर्क केलं. त्यामुळे शंभरपेक्षा जास्त पिस्टल हस्तगत करण्यात यश आलं - अरूण देवकर- पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा.