कराड पंचायत समितीत ऐतिहासिक ‘सत्तांतर’!; आमदार डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे यांचा करिष्मा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 17:49 IST2026-02-10T17:48:52+5:302026-02-10T17:49:27+5:30

रात्री उशिरापर्यंत फेरमतमोजणी, ..अखेर परिवर्तनाचे ‘कमळ’ फुलले

Historic change of power in Karad Panchayat Samiti on Monday | कराड पंचायत समितीत ऐतिहासिक ‘सत्तांतर’!; आमदार डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे यांचा करिष्मा 

कराड पंचायत समितीत ऐतिहासिक ‘सत्तांतर’!; आमदार डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे यांचा करिष्मा 

प्रमोद सुकरे

कराड : सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून ओळख असलेल्या कराडपंचायत समितीत सोमवारी ऐतिहासिक सत्तांतर घडले. कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले व उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी २४ पैकी १३ जागा जिंकत परिवर्तनाचे ‘कमळ’ फुलवले. पण हा निकाल दोन्ही राष्ट्रवादीला धक्का देणारा आहे. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काँग्रेसच्या ‘हाता’लाही फार काही लागलेले दिसत नाही.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून कराडची ओळख आहे. त्यांचे स्मृतिस्थळ तर राजकीय पंढरी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे कराडच्या राजकीय घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागून राहिलेले असते. येथील पंचायत समितीच्या सभापतीला नेहमीच अनन्यसाधारण महत्त्व राहिले आहे. पंचायत समिती स्थापनेपासून या पंचायत समितीवर पुरोगामी विचारांचा पगडा पाहायला मिळाला आहे. सुरुवातीच्या काळात काँग्रेसची तर त्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे.

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या कराड तालुक्यात यावेळी मात्र गट व गणात मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शेवटपर्यंत उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली होती. रात्री उशिरा भाजपने २४ पैकी १३ जागा जिंकत सत्तांतर केले. तर राष्ट्रवादी (अजित पवार)चे नेते ॲड. उदयसिंह पाटील यांनी स्वतःचा गट राखत समाधानकारक कामगिरी केली, असे म्हणावे लागेल. मात्र, राष्ट्रवादी (शरद पवार)चे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना चांगलाच फटका बसलेला पाहायला मिळतोय.

कोणते गण कोणाकडे?

भाजप- चरेगाव, वडोली भिकेश्वर, मसूर, हजारमाची, सैदापूर, कोयना वसाहत, कोळे, विंग, गोळेश्वर, शेरे, रेठरे बुद्रुक, काले, वाघेरी
राष्ट्रवादी (अजित पवार)- कालवडे, येळगाव, सवादे, कार्वे
काँग्रेस- तळबीड, वारुंजी
शिंदेसेना- सुपने, तांबवे
राष्ट्रवादी(शरद पवार)- कोपर्डे हवेली, पाल, उंब्रज

जिल्हा परिषदेत असे आहे बलाबल

  • भाजप - ८
  • राष्ट्रवादी (अजित पवार) - २
  • काँग्रेस - १
  • अपक्ष - १


प्रियांका साळुंखे विजयी..

रेठरे बुद्रुक जिल्हा परिषद गटातील भाजपच्या उमेदवार प्रियांका साळुंखे यांनी तब्बल १० हजार ६०० मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. या गणातील पैलवान धनाजी पाटील यांनी ५ हजार ८०० मतांचे मताधिक्य घेत विजय संपादन केला. कदाचित हे मताधिक्य जिल्ह्यातील सर्वात जास्त असू शकते.

रात्री उशिरापर्यंत फेरमतमोजणी

दरम्यान, कराड तालुक्यातील मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. अनेक गणांतील उमेदवारांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केली आहे. त्यामुळे निकाल बदलतील की काय? अशी चर्चा सुरू होती.

Web Title : कराड पंचायत समिति में सत्ता परिवर्तन; भोसले, घोरपड़े की जीत!

Web Summary : कराड पंचायत समिति में ऐतिहासिक सत्ता परिवर्तन हुआ, भाजपा ने 24 में से 13 सीटें जीतीं। कांग्रेस और पवार की राकांपा को झटका लगा, जबकि अजित पवार की राकांपा ने संतोषजनक प्रदर्शन किया। प्रियंका सालुंखे ने भारी मतों से जीत हासिल की।

Web Title : Karad Panchayat Samiti witnesses power shift; Bhosale, Ghorpade's victory!

Web Summary : Karad Panchayat Samiti saw a historic power shift as BJP won 13 out of 24 seats. Congress and Pawar's NCP faced setbacks, while Ajit Pawar's NCP performed satisfactorily. Priyanka Salunkhe won with a significant margin.