Satara: हिंदकेसरी बैल ‘वजीर’ने घेतली ‘एक्झिट!, बैलगाडा शर्यतीत तुफानी वेगामुळे होता लोकप्रिय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 16:30 IST2025-04-25T16:27:09+5:302025-04-25T16:30:14+5:30
Hind Kesari Wazir Death: पाचशेपेक्षा जास्त शर्यतीमध्ये फायनलमध्ये विजय पटकावला

Satara: हिंदकेसरी बैल ‘वजीर’ने घेतली ‘एक्झिट!, बैलगाडा शर्यतीत तुफानी वेगामुळे होता लोकप्रिय
रहीमतपूर (जि. सातारा) : कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील बैलगाडा शर्यतीतील ‘बिनजोडचा बादशहा’ अशी बिरुदावली मिरवणारा हिंदकेसरी वजीर याची आजाराशी लढता-लढता सोमवारी रात्री प्राणज्योत मालवली. वजीरच्या अचानक झालेल्या निधनामुळे जयपूरसह वजीरप्रेमी दुःखाच्या खाईत लोटले गेले.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील ‘वजीर’ हे नाव केवळ जिल्ह्यातच नव्हे, तर बैलगाडा क्षेत्रात महाराष्ट्रभर ‘बिनजोडचा बादशहा’ म्हणून ओळखले जात होते. अनेक वर्षे अपराजित राहिलेल्या वजीरचा महाराष्ट्रात दबदबा होता. बैलगाडा अड्ड्यावर वजीरभोवती घुटमळणारी युवा पिढी पाहून वजीरवर किती जीव आहे, हे दिसून येत होतं.
तुफानी वेगामुळे लोकप्रिय
वजीरने आपल्या १७-१८ वर्षांच्या जीवनात पाचशेपेक्षा जास्त शर्यतीमध्ये फायनलमध्ये विजय पटकावला आहे. जयपूर येथील प्रकाश निकम, विकास निकम व दत्तात्रय निकम यांच्या दावणीला असलेला वजीर तुफानी वेगामुळे लोकप्रिय होता.
‘वजीर’ला पाहण्यासाठी शर्यतप्रेमींची व्हायची गर्दी
अड्ड्यावर ‘वजीर’ येणार म्हटलं की त्याला पाहण्यासाठी बैलगाडा शर्यतप्रेमींची प्रचंड गर्दी व्हायची. तहान भूक हरवून फायनल होईपर्यंत युवाप्रेमी मैदान सोडत नसे. असा हा महाराष्ट्राचा लाडका वजीर गेल्या दोन महिन्यांपासून आजाराशी लढत होता. मजबूत शरीरयष्टीचा वजीर आजारपणामुळे कमजोर झाला होता, हे पाहून निकम कुटुंबीयांचं मन हेलावत होतं. सोमवारी (दि. २१) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास वजीरची प्राणज्योत मालवली.