पुणे-बंगळुरू महामार्गावरील कोंडी रोखण्यासाठी खंडाळ्याजवळ अवजड वाहने रोखली, चालकांतून संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 16:17 IST2025-11-01T16:17:06+5:302025-11-01T16:17:35+5:30
वाहनांमध्ये नाशवंत माल असल्याने आर्थिक फटका..

संग्रहित छाया
सातारा : दिवाळी सुटी संपवून मुंबई-पुणे शहराकडे परतणाऱ्या चाकरमान्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून जुना पुणे-बंगळुरू महामार्गावर कायम वाहतूक काेंडी होत आहे. ही वाहतूक काेंडी कमी करण्यासाठी तसेच नियंत्रण मिळवण्यासाठी साताऱ्याकडून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना खंडाळ्याजवळील सेवा रस्त्यावर थांबविण्यात आले. त्यामुळे सकाळपासून येथे माेठ्या प्रमाणावर अवजड वाहने अडकून राहिल्याने जवळपास वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
यावेळी वाहनचालकांच्या भावना तीव्र झाल्या. ते म्हणाले, ‘पुण्यात वाहतुकीची कोंडी होत असल्यास महामार्गावर वाहने अडवून त्याचा फायदा नेमका काय? तसेच टोलवसुली होत असताना अशी अडवणूक करून त्रास देणे अन्यायकारक आहे. माल वेळेत पाेहोचू शकला नाही, त्यामुळे हाेणाऱ्या नुकसानीस काेण जबाबदार असणार, वाहतूक नियंत्रण पथकाने याबाबत अगाेदरच नियाेजन करणे गरजेचे आहे. जेणेकरून वाहतुकीचा आणि मालवाहतुकीचा दोन्हींना अडथळा निर्माण होणार नाही.
वाहनांमध्ये नाशवंत माल असल्याने आर्थिक फटका...
वाहतूक नियंत्रक विभागाच्या या निर्णयामुळे अवजड वाहन चालकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. जवळपास चार तासांहून अधिक काळ एकाच जागी वाहने थांबवून राहिल्याने वाहनचालकांचे हाल होत होते. या वाहनांमध्ये नाशवंत माल असल्याने वेळेवर पाेहोच करता आला नाही. त्यामुळे याचा आर्थिक फटका संबंधितांना सहन करावा लागला.