विजेच्या लंपडावाने शेतकरी मेटाकुटीला, भारनियमनाचा परिणाम; शेतीची कामे खोळंबली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 13:08 IST2022-04-15T13:08:20+5:302022-04-15T13:08:56+5:30
चार दिवसांपासून विजेचे भारनियमन वाढवण्यात आले. ते असतानाच वीज कधी येणार आणि कधी बंद होणार या विषयी विजवितरण कंपनीकडे नियोजन नाही.

विजेच्या लंपडावाने शेतकरी मेटाकुटीला, भारनियमनाचा परिणाम; शेतीची कामे खोळंबली
कोपर्डे हवेली : सध्या उन्हाळा मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने ऊष्णतेच वाढ झाली आहे. उन्हाळ्यामुळे पिकांना जादा पाणी लागत आहे. त्यातच वीजेचे भारनियमन वाढले आहे. वीज येणा-जाण्यात सातत्य नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. महावितरण कंपनीकडे वीजेचे वेळापत्रक नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
दिवस आणि रात्री विभागानुसार वीज वितरण कंपनीकडून कृषी पंपाला आठ तास वीज दिली जाते. चार दिवसांपासून विजेचे भारनियमन वाढवण्यात आले. ते असतानाच वीज कधी येणार आणि कधी बंद होणार या विषयी विजवितरण कंपनीकडे नियोजन नाही.
काहीवेळा विभानुसार व्हाट्सअप मेजेस विज वितरण कंपनीकडून पाठवले जातात. त्यामध्ये वीज येणार नाही असे सांगितले जाते. पण येणार कधी हे सांगितले जात नसल्याने शेतकऱ्यांना वाट पाहत बसावे लागते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिकांना जादा पाणी लागत आहे. पाणी असूनही देता येत नाही अशी अवस्था विजेआभावी होत आहे.
शेतकरी विजेची वाट पाहत बसत असल्याने दुसऱ्या कामांचा खोळांबा होत आहे. बीले भरुन आम्हाला वेळेत वीज मिळत नाही, आशी शेतकऱ्यांची भावना आहे. भारनियमनात विजेचे वेळापत्रक ठरवून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून होत आहे.