Satara: महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस; आंबेनळी घाटात दरडचे सत्र सुरू, लिंगमळा धबधबा पर्यटनासाठी बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 18:44 IST2025-07-16T18:44:23+5:302025-07-16T18:44:40+5:30
पोलादपूरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद

Satara: महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस; आंबेनळी घाटात दरडचे सत्र सुरू, लिंगमळा धबधबा पर्यटनासाठी बंद
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. सोमवारी दिवसभर व रात्री धुवाधार पाऊस कोसळला. मंगळवारी सकाळपासून पावसाची अधूनमधून बॅटिंग सुरू होती. संततधार पावसामुळे तालुक्यातील दुर्गम बिरमणी गावाकडे जाणाऱ्या पुलावर कोयना नदीचे पाणी आल्याने गावाचा संपर्क तुटला. अंबेनळी घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे.
महाबळेश्वर-कोकणाला जोडणाऱ्या आंबेनळी घाट रस्त्यावर पोलादपूर हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळून मलबा रस्त्यावर आला आहे, त्यामुळे आंबेनळी घाटामधून वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू होण्यास विलंब लागणार आहे. यामुळे महाबळेश्वर व पोलादपूर प्रशासनाने समन्वयाने हा घाटरस्त्यावरील वाहतूक बंद केली आहे. महाबळेश्वरच्या महाड नाका येथे बॅरिगेट्स लावून पोलादपूरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. याचा आढावा तहसीलदार सचिन मस्के यांनी मंगळवारी सकाळी घेतला.
महाबळेश्वरमधील लिंगमळा धबधबा
सोमवारी रात्रीपासून पाऊस जास्त प्रमाणात असल्यामुळे वनविभागामार्फत वेण्णा नदीवरील लिंगमळा धबधबा सध्या तात्पुरत्या स्वरूपात पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आला असल्याची माहिती मिळाली. मंगळवारी दिवसभर पावसाची अधूनमधून बॅटिंग सुरू होती. आजअखेरपर्यंत महाबळेश्वर शहरात चोवीस तासांत १४७.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.