Satara- सह्याद्री कारखाना निवडणूक: स्वाभिमानीच्या 'त्या' याचिकेवर उद्या मुंबईत सुनावणी
By प्रमोद सुकरे | Updated: March 20, 2025 16:30 IST2025-03-20T16:30:18+5:302025-03-20T16:30:57+5:30
शेवटच्या तारखेपर्यंत धाकधुक..

संग्रहित छाया
प्रमोद सुकरे
कऱ्हाड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ५ एप्रिल रोजी होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात यांचा अर्ज छाननीत अवैध ठरवला होता. त्यावर थोरात यांनी त्यांच्यासह ९ जणांनी प्रादेशिक सहसंचालकांकडे अपील केले होते. त्यात ते अर्ज पुन्हा वैध ठरवले. मात्र निवास थोरात यांच्या या निकाला विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तेथे रिट पिटिशन दाखल केले आहे. त्यावर शुक्रवार दि २१ रोजी न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
शेळके म्हणाले, खरंतर निवास थोरात यांच्या अर्जांच्या विरोधात आमच्या संघटनेचे उमेदवार मुरलीधर गायकवाड यांनी हरकत घेतली होती. ती हरकत बरोबर असल्यानेच निवडणूक अधिकारी संजयकुमार सुद्रिक यांनी त्यांचा अर्ज अवैध ठरवला होता. मात्र थोरातांनी लगेचच पुणे येथील साखर सहसंचालकांकडे अपील केले. त्यावर १३ मार्चला सुनावणी झाली.
तेथे नेमके काय घडले हे माहित नाही. पण निकाल बदलला व त्यांनी हा अर्ज १८ मार्चला वैद्य धरला. पण आम्हाला हा निकाल मंजूर नसल्यानेच आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली.बुधवारी दि.१९रोजी रिट पिटिशन दाखल केले. आता शुक्रवार दि २१ रोजी याबाबत सुनावणी घेतली आहे.
याबाबत न्यायालयाने उमेदवार निवास थोरात, प्रादेशिक सहसंचालिका नीलिमा गायकवाड, निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रिक यांच्यासह २०७ जणांना नोटीस काढली आहेत. त्यात त्यांना हजर रहाण्याचे नमुद केले आहे. न्यायालयात आमचे वकिल बाजू मांडतील. आम्हाला न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे.
शेवटच्या तारखेपर्यंत धाकधुक..
खरंतर सह्याद्री कारखाना निवडणुकीत अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २१ मार्च आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. त्यातच निवास थोरात यांच्या अर्जावर मुंबईत याच दिवशी सुनावणी होत असल्याने नेमके काय होणार ? याची धाकधूक त्यांच्या समर्थकांना लागून राहिली आहे.