अनोखा प्रयोग! साताऱ्यातील ओढ्यांवर साकारतेय ‘हॅँगिंग गार्डन’; कचरा डेपोतील प्लास्टिक बाटल्यांचा असाही वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 01:55 PM2022-12-26T13:55:25+5:302022-12-26T13:56:12+5:30

शहराच्या सौंदर्यात भर

Hanging Garden is being created on streams in Satara, Use of plastic bottles in waste depots | अनोखा प्रयोग! साताऱ्यातील ओढ्यांवर साकारतेय ‘हॅँगिंग गार्डन’; कचरा डेपोतील प्लास्टिक बाटल्यांचा असाही वापर

अनोखा प्रयोग! साताऱ्यातील ओढ्यांवर साकारतेय ‘हॅँगिंग गार्डन’; कचरा डेपोतील प्लास्टिक बाटल्यांचा असाही वापर

Next

सातारा : शहर स्वच्छतेत राज्य व देशपातळीवर आपला नावलौकिक उंचावणारे सातारा शहर आता कात टाकू लागले आहे. मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या संकल्पनेतून शहरातील ओढ्यांचा कायापालट झाला असून, या ओढ्यांवरील जाळीवर शोभिवंत रोपांच्या कुंड्या लावण्यात आल्या आहेत. या कुंड्या शहराच्या सौंदर्यात भर घालू लागल्या आहेत.

केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२२’ या अभियानात सातारा पालिकेने देशात अकरावा, तर राज्यात तिसरा क्रमांक पटकविला. दिल्ली येथील सोहळ्यात पालिकेचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवदेखील करण्यात आला आहे. स्वच्छ व सुंदर शहराची ही परंपरा पुढे कायम ठेवण्यासाठी मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी शहरात नवनवे प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून शहरातील ओढ्यांवर शोभिवंत रोपांच्या कुंड्या लावल्या जात आहेत.
पालिका प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर विसावा नाका येथील एका ओढ्यावर अशा प्रकारच्या कुंड्या लावल्या होत्या. या कुंड्या व त्यातील रोपांचे योग्य पद्धतीने संवर्धन झाल्याने मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील इतर ओढ्यांवर अशा कुंड्या लावण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार शहरात ठिकठिकाणी मिळून सुमारे दोन हजार कुंड्या लावण्यात आल्या असून, या अनोख्या प्रयोगामुळे ओढ्यांत कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शिवाय या कुंड्या शहराच्या वैभवातही भर घालू लागल्या आहेत.

कचरा डेपोतील प्लास्टिक बाटल्यांचा असाही वापर

  • सातारा पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोत दररोज मोठ्या संख्येने प्लास्टिक बाटल्या संकलित केल्या जातात.
  • या बाटल्यांचा वृक्षलागवडीसाठी कल्पकतेने वापर करण्यात आला आहे.
  • एका बाटलीचे दोन काप करून प्रत्येक बाटलीत शोभिवंत झाड लावून ते ओढ्यांवरील जाळीवर लावण्यात आले आहे.


आतापर्यंत लागल्या २ हजार कुंड्या

पालिकेने विसावा नाका, माची पेठ, कोटेश्वर मंदिर, हुतात्मा स्मारक या ठिकाणी मिळून तब्बल २ हजार कुंड्या लावल्या आहेत. शहरातील सर्वच ओढ्यांवर अशा प्रकारच्या कुंड्या लावून शहराचे सुशोभीकरण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

कुंड्यांमधील शोभिवंत फुलझाडे
चिनी गुलाब, हॉपिस टाइम, रोहिओ, मनी प्लान्ट

नागरिकांनी पालकत्व स्वीकारावे

शहर सुशोभीकरणासाठी पालिकेकडून नवनवीन प्रयोग राबविले जात आहे. पालिकेच्या या प्रयत्नांना नागरिकांनी देखील पाठबळ द्यायला हवे. शहरात ज्या-ज्या भागात अशा कुंड्या लावण्यात आल्या आहेत, त्या कुंड्यांत पाणी घालण्याचे काम पालिकेकडून जरूर केले जाईल. मात्र, नागरिकांनी देखील या रोपांचे पालकत्व स्वीकारून आपापल्या भागातील कुंड्यांना पाणी घालावे. - अभिजित बापट, मुख्याधिकारी

Web Title: Hanging Garden is being created on streams in Satara, Use of plastic bottles in waste depots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.