यात्रेसाठी निघालेल्या आजोबांसह नातवाचा टँकरच्या धडकेत मृत्यू, पाडेगाव येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 14:27 IST2022-05-09T14:27:25+5:302022-05-09T14:27:44+5:30

पाडेगाव आणि बाळूपाटलाचीवाडी हे अंतर अवघे तीन किलोमीटर आहे. हे अंतर पार करण्यापूर्वीच दोघांवर काळाचा घाला घातला.

Grandfather and grandson died on the spot in the accident in Padegaon, Tal. Khandala satara | यात्रेसाठी निघालेल्या आजोबांसह नातवाचा टँकरच्या धडकेत मृत्यू, पाडेगाव येथील घटना

यात्रेसाठी निघालेल्या आजोबांसह नातवाचा टँकरच्या धडकेत मृत्यू, पाडेगाव येथील घटना

लोणंद : पाडेगाव, ता. खंडाळा येथील यात्रेसाठी जात असताना टँकरने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील आजोबासह नातवाचा जागीच मृत्यू झाला. हनुमंत दिनकर धायगुडे (वय ६५), ओम विजय धायगुडे (वय १२, दोघेही रा. बाळूपाटलाचीवाडी) असे अपघातात ठार झालेल्या आजोबा आणि नातवाचे नाव आहे. हा अपघात रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास बाळूपाटलाचीवाडी येथे झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाडेगावची रविवारी यात्रा होती. या यात्रेसाठी आजोबा हनुमंत धायगुडे आणि नातू ओम हे लुनावरून निघाले होते. घरापासून काही अंतरावर पोहोचल्यानंतर तीव्र उतारावर पाठीमागून टँकरने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे दोघेही दूरवर फेकले गेले. आजोबा हनुमंत धायगुडे आणि नातू ओम हे दोघेही गंभीर जखमी झाले. नातू ओम याला तर रक्ताची उलटी झाली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला तर काहीवेळात आजोबा हनुमंत धायगुडे यांनीही जीव सोडला.

रुग्णालयात नेण्यापूर्वीच आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाल्याचे समजताच बाळूपाटलाचीवाडीवर शोककळा पसरली. पाडेगाव आणि बाळूपाटलाचीवाडी हे अंतर अवघे तीन किलोमीटर आहे. हे अंतर पार करण्यापूर्वीच दोघांवर काळाचा घाला घातला.

ओम हा पाचवीमध्ये शिकत होता. रात्री साडेनऊ शवविच्छेदन झाल्यानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर हे अधिक तपास करीत आहेत.

उताराने घेतले आजवर अनेकांचा बळी

या तीव्र उतारावर ठिकाणी अनेक अपघात झाले असून अनेकांना आपले जीव गमावावे लागले आहेत. तर कित्येकजण जखमी झाले आहेत.या ठिकाणी गतिरोधक बसविण्यासाठी रंबल स्ट्रीप्स किंवा स्पीड बेकर टाकण्यात यावेत, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Web Title: Grandfather and grandson died on the spot in the accident in Padegaon, Tal. Khandala satara