Satara: लोणंद वखार केंद्रात ८७ लाखांचा धान्य अपहार; तत्कालीन केंद्रप्रमुखावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 18:44 IST2025-11-19T18:43:37+5:302025-11-19T18:44:43+5:30
धान्य परस्पर लंपास केले

Satara: लोणंद वखार केंद्रात ८७ लाखांचा धान्य अपहार; तत्कालीन केंद्रप्रमुखावर गुन्हा
लोणंद : लोणंद वखार केंद्रात गेल्या आठ वर्षांत तब्बल ८७ लाख ७६ हजार ९०३ रुपयांच्या महत्त्वाच्या शासकीय मालमत्तेचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कापडगाव (ता. फलटण) येथील वखारीचे तत्कालीन केंद्रप्रमुख समीर अशोक नाडगौड यांच्या विरोधात लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कोल्हापूर विभागीय प्रमुख तृप्ती कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, समीर नाडगौड यांनी ६ जून २०१६ ते २ डिसेंबर २०२४ या कालावधीत वखारातील १० लाख ५६ हजार ९५५ रुपये किमतीचा ७६२ पोती गहू तसेच ११ लाख ६५ हजार ९३६ रुपये किमतीचा ५७६ पोती तांदूळ असा २२ लाख २२ हजार ८९१ रुपये किमतीचे धान्य परस्पर लंपास केले.
याशिवाय, आयआरआरएस व डीओएस प्रणालीमध्ये बनावट नोंदी करून ६५ लाख ५४ हजार ०१२ किमतीच्या तांदळाचा अपहार झाल्याचेही चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळे अपहार रक्कम तब्बल ८७ लाख ७६ हजार ९०३ इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक रोहित हेगडे तपास करत आहेत.
त्रुटी चव्हाट्यावर
राज्य वखार महामंडळाच्या तपासात समोर आलेल्या या गैरव्यवहारामुळे साठवण व्यवस्थापनातील त्रुटी, अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि प्रणालीतील याकडे दोष पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.