Satara: पाचगणीत अमली पदार्थ तस्करांची टोळी जेरबंद; कोकेनसह ४२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, सर्व आरोपी मुंबईतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 13:57 IST2025-12-18T13:57:03+5:302025-12-18T13:57:03+5:30
सातारा जिल्ह्यात परजिल्ह्यातील गुन्हेगार कारवाया करत असल्याचे समोर आले

Satara: पाचगणीत अमली पदार्थ तस्करांची टोळी जेरबंद; कोकेनसह ४२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, सर्व आरोपी मुंबईतील
पाचगणी : पाचगणी जवळील घाटजाई मंदिराजवळ कोकेन सदृश अमली पदार्थ विकणारी १० जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखा व पाचगणी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून जेरबंद केली. मंगळवारी मध्यरात्री केलेल्या या कारवाईत पोलिसांनी कोकेन सदृश अमली पदार्थ, दोन कार व मोबाईल असा एकूण ४२.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्री पाचगणी पोलिसांना घाटजाई मंदिराजवळ कोकेन सदृश अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचला. रात्री १२.०५ च्या सुमारास विस्टा ग्रँड सोसायटीमधील ‘इस्टेला-१ ए’ बंगल्याजवळील पार्किंगमध्ये छापा टाकण्यात आला. तेथे दोन अलिशान कार (एमएच ०२ डी.एन.०२५९) व (एमएच ०१ डी.के. ८८०२) उभ्या होत्या.
या दोन्ही कारमध्ये महंमद नावेद सलिम परमार (वय ३२), सोहेल हशद खान (वय ३५), महंमद ओएस रिजवान अन्सारी (वय ३२), चासिल हमीद खान (वय ३१), महंमद साहिल अन्सारी (वय ३०), जिशान इरफान शेख (वय ३१), सैफ अली कुरेशी (वय २१), महंमद उबेद सिद्धीकी (वय २७), अली अजगर सादिक राजकोटवाला (वय ३०), राहिद मुख्तार शेख (वय ३१) सर्व रा. मुंबई. हे दहाजण आढळून आले.
पाच लाखाचे कोकेन जप्त...
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. यावेळी त्यांच्याजवळ ५ लाखांचे कोकेन सदृश अमली पदार्थ, दोन चारचाकी वाहने व मोबाइल हँडसेट असा मुद्देमाल आढळून आला. त्यांची चौकशी केली असता अमली पदार्थ पाचगणी शहरात विक्री करण्यासाठी आणल्याचे आरोपींनी कबूल केले. या प्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक परितोष दातीर तपास करीत आहेत.
सर्व आरोपी मुंबईतील
पाेलिसांनी अटक केलेले सर्व आरोपी हे मुंबई येथे वेगवेगळ्या भागात राहत आहेत. कारवाईनंतर सातारा जिल्ह्यात परजिल्ह्यातील गुन्हेगार कारवाया करत असल्याचे समोर आले आहे.