Satara: बोगस मतदार नोंदणीप्रकरणी कराड येथे गणेश पवार यांचे उपोषण सुरू, विविध संघटनांचा पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 16:17 IST2025-10-09T16:17:26+5:302025-10-09T16:17:41+5:30
प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार

Satara: बोगस मतदार नोंदणीप्रकरणी कराड येथे गणेश पवार यांचे उपोषण सुरू, विविध संघटनांचा पाठिंबा
कराड : कापील (ता. कराड) येथे झालेल्या बोगस मतदार नोंदणीबाबत दोषींवर फौजदारी कारवाई करावी, कार्यवाहीत अक्षम्य चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी बुधवारपासून कराड तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. त्याला विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कापील येथे रहिवासी नसलेल्या लोकांनी कापील गावच्या पत्त्याचे बनावट आधार कार्ड तयार करून कापील गावामध्ये मतदान नोंदणी करून मतदान केलेले आहे, असा गणेश पवार यांचा आरोप आहे. त्याबाबतचे पुरावे त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
तसेच मतदार नोंदणी अधिकारी, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी या लोकांची पूर्वीच्या ठिकाणांची नावे कमी न करता कोणत्या कायद्याखाली नावे वाढवली. याबाबतची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. संजय गांधी योजनेचे अव्वल कारकून युवराज पाटील यांना कोणताही आदेश नसताना निवडणूक शाखेत केलेल्या चुकीच्या कामामुळे त्यांना निलंबित करून खातेनिहाय चौकशी करावी, या मागणीसाठी पवार यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे गणेश पवार यांनी सांगितले.