सातारा : ढोल-ताशांचा गजर... मोरया.. मोरयाचा जयघोष करत साताऱ्यात गुरुवारी सर्वांच्या लाडक्या बाप्पांचे आगमन झाले. गावोगावी मिरवणुका काढण्यात आल्या असून, त्यामध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका सायंकाळी निघणार असून, त्यानंतर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
सुखकर्ता, दु:खहर्ता गणरायांच्या स्वागताचे शाहूनगरीला अनेक दिवसांपासून वेध लागले होते. आकर्षक मूर्ती बनविण्यात कारागीर मग्न होते. बाजारपेठही चांगलीच फुलली होती. गुरुवारी सकाळीपासूनच बाजारपेठेत गर्दी झाली होती. ग्रामीण भागातून शेतकरी दुर्वा, फुले, आघाडा विक्रीसाठी घेऊन आले होते. घरगुती बाप्पांना घरी नेण्यासाठी कुंभारवाड्यांमध्ये गर्दी झाली होती.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मोठी मूर्ती मात्र मिरवणुकीद्वारेच केली जात होती. प्रत्येक मंडळ त्यांच्या सोयीनुसार मूर्ती घेऊन जात होते. मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळी काढली जात होती.
पोलीस बंदोबस्तात वाढ पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्याने अनेक मंडळांना मरिआई कॉम्प्लेक्स परिसरातून मूर्ती नेताना अडचणी येत होत्या. पोलीस सर्व मंडळांना वाट मोकळी करून मिरवणूक घेऊन जाण्यासाठी मदत करत होते.