पोट दुखणाऱ्या 'त्या' विरोधकांसाठी मोफत दवाखाना; एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 11:46 IST2025-10-18T11:45:02+5:302025-10-18T11:46:47+5:30
मी दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाऊ लागले

पोट दुखणाऱ्या 'त्या' विरोधकांसाठी मोफत दवाखाना; एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना चिमटा
सातारा : ‘मी दिल्लीत जावे अथवा गावाकडे, अनेकांची पोटदुखी सुरू होते. अशांचा मी विचार करत नाही. सर्व पोटदुखीवाल्यांची व्यवस्था आम्ही केली असून, त्यांच्यासाठी मोफत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला असल्याचा चिमटा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. याविषयीचा त्यांचा व्हीडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.
सातारा जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दरे गावातील शिवारात फेरफटका मारला. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांकडे सध्या मुद्दाच नाही. त्यामुळे ते कोणत्याही गोष्टीचे राजकारण करत आहेत.
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडे ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज करेन, याची त्यांनी कल्पना केली नव्हती. मी दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाऊ लागले. त्यामुळे मुद्दा नसल्यामुळे ते दिशाभूल करत आहेत. जर चांगला निर्णय घेतला तर त्याला चांगले म्हटले पाहिजे.
हेच लोक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन चांगले मुख्यमंत्री आहेत, असे म्हणत होते. आता मात्र मुख्यमंत्री कसे अपयशी आहेत, हे सांगत सुटले आहेत. ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे. हे त्यांचे कायमचे रडगाणे आहे. बाळासाहेबांनी आम्हाला रडायला नाही तर लढायला शिकवले, असा टोलाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.