वंदे भारत ट्रेनमध्ये नोकरीचे आमिष; पावणेदोन कोटींची फसवणूक, चेंबूरच्या नगरसेविकेसह अकराजणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:26 IST2026-02-13T13:25:05+5:302026-02-13T13:26:31+5:30
मेढा पोलिसांकडून तपास सुरू

संग्रहित छाया
सातारा : वंदे भारत ट्रेन व सार्वजनिक बांधकाम विभागात मुलांना शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल एक कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या आरोपावरून चेंबूरच्या नगरसेविकेसह अकराजणांवर मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरीफा टाटा खान (नगरसेविका, चेंबूर, मुंबई), समीर चुंडमुंग, जहीर अमानुल्ला खान, इमान अमानुल्ला खान, नीलेश बाळकृष्ण ठाकूर, आनंद सिंग ऊर्फ बाबू शेठ ऊर्फ अंकल (रा. मुंबई व रांची, झारखंड), रेणू रामूसिंग ऊर्फ रेणू नीलेश ठाकूर, आशिष अगरवाल (रेल्वे विभाग अधिकारी), सुधीर गायकवाड (बांधकाम विभाग, मुंबई), किशोर माळी (बांधकाम विभाग, मुंबई), शामल मुखर्जी (मंत्रालय, मुंबई), अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत शैलेश काशिनाथ पवार (वय ४८, रा. महिगाव, ता. जावळी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयितांनी व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. बँक ऑफ महाराष्ट्र, सायगाव (ता. जावळी) येथील खात्यामार्फत तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, सोलापूर व मुंबई येथे संशयितांना रोख रक्कम व यूपीआय व्यवहाराद्वारे एकूण एक कोटी ८० लाख रुपये दिले. मात्र, पैसे परत द्यावे लागू नये म्हणून रेल्वे व बांधकाम विभागात भरती निघाली असल्याचे आम्हाला खोटे सांगितले.
भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने मुलांना वेळोवेळी ई-मेल, व्हाॅट्सॲप, मेसेज व फोन करून नियुक्तीबाबत खोटे व बनावट आदेश तयार केले. बांधकाम विभागाच्या कार्यालयात हजर करून मुलाखती घेऊन जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर, सोलापूर व कोल्हापूर या ठिकाणी मुलांच्या खोट्या वैद्यकीय तपासण्या केल्या. नेमणुकीचे खोटे पत्र तयार करून मला व मुलांना पाठविल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.