Satara Crime: दरोडेखोरांच्या टोळीकडून चौदा पिस्तुल हस्तगत, दहाजण ताब्यात; कऱ्हाडात मोठी कारवाई
By संजय पाटील | Updated: March 28, 2023 15:47 IST2023-03-28T15:46:47+5:302023-03-28T15:47:09+5:30
एकाचवेळी चौदा पिस्तूल हस्तगत झाल्यामुळे जिल्ह्यात खळबळ

Satara Crime: दरोडेखोरांच्या टोळीकडून चौदा पिस्तुल हस्तगत, दहाजण ताब्यात; कऱ्हाडात मोठी कारवाई
कऱ्हाड : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल १४ पिस्तूल तसेच २२ जिवंत काडतूस हस्तगत केली. कऱ्हाड तालुक्यातील राजमाची येथे सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. एकाचवेळी चौदा पिस्तूल हस्तगत झाल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारच्या गुन्हे शाखेचे पथक मंगळवारी सकाळी कऱ्हाड शहरात कोम्बिंग आॅपरेशन राबवत असताना विटा मार्गावर असलेल्या जानाई मंदिरानजीक उसाच्या शेतात काहीजण लपून बसल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे, निरीक्षक अरुण देवकर यांच्यासह पथकाने तातडीने त्याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी दरोडेखोरांची टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी छापा टाकताच दरोडेखोरांनी उसाच्या शेतातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. यावेळी दहा दरोडेखोरांकडून ९ लाख ११ हजार ९०० रुपये किमतीच्या १४ देशी बनावटीच्या पिस्तूल, २२ जिवंत काडतूस, मिरची पूड, कोयता हस्तगत करण्यात आला. या टोळीवर कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.