Satara Crime: भवानवाडीत भांडणातून गोळीबार; फिर्यादीने चपळाई केली अन् बंदूक वर ढकलून गोळी चुकवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 13:20 IST2025-03-22T13:18:19+5:302025-03-22T13:20:54+5:30
संशयित दोन तासांत जेरबंद

Satara Crime: भवानवाडीत भांडणातून गोळीबार; फिर्यादीने चपळाई केली अन् बंदूक वर ढकलून गोळी चुकवली
सातारा : भवानवाडी, ता. कऱ्हाड येथे भांडणातून चार जणांनी फिर्यादीला दमदाटी करून सिंगल बोर बंदुकीतून गोळी झाडली. सुदैवाने फिर्यादीने चपळाईने बंदुकीचा बॅरल वर ढकलल्याने राऊंड कानाजवळून गेला. यानंतर चाैघांनी फिर्यादीच्या कामगारास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व हवेत चार राउंड फायर केले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उंब्रज पोलिसांनी दोन तासांत संशयितांना अटक करून १ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत केला.
याबाबत माहिती अशी, फिर्यादी यांच्या ऊसतोड कामगारात आणि संशयित मकरंद गुलाब सूर्यवंशीचा ट्रॅक्टर चालक पाखऱ्या यांच्यात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दि. १८ रोजी रात्री ८.३० वाजता सुमारास भवानवाडी, ता. कऱ्हाडच्या हद्दीत सोन्या ऊर्फ ऋषिकेश गुलाब सूर्यवंशी, मकरंद गुलाब सूर्यवंशी दोघे रा. सूर्यवंशी मळा, चरेगाव, ता. कऱ्हाड, पुंजाराम सुखदेव पाखरे रा. सूर्यवंशी मळा, चरेगाव, मूळ रा. पोकळवड, ता. जालना, राज अंकुश आवळे रा. खालकरवाडी ता. कऱ्हाड हे सर्व आले.
यावेळी सोन्या ऊर्फ ऋषिकेश गुलाब सूर्यवंशी याने सिंगल बोर बंदुकीने जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या अंगावर फायर केला. यावेळी फिर्यादीने बंदुकीचा बॅरल वर ढकलल्याने राऊंड त्याच्या कानाजवळून गेला. यानंतर मकरंद सूर्यवंशी व पुंजाराम पाखरे यांनी फिर्यादीचे ऊसतोड कामगार मुकेश पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ऋषिकेश सूर्यवंशीने हवेत बंदुकीतून चार राऊंड फायर करून दहशत केली. संशयितांनी फिर्यादीस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रार दाखल होताच उंब्रज पोलिसांनी भवानवाडी, खालकरवाडी, चरेगाव भागामध्ये पेट्रोलिंग करून संशयितांना दोन तासांत अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता ५ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली बंदूक, रिकाम्या पुंगळ्या व मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे करीत आहेत.
अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती द्यावी
या घटनेनंतर पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी नागरिकांना अवैध शस्त्र बाळगण्याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे. तसेच अवैध शस्त्र कोणत्याही परिस्थितीमध्ये नागरिकांनी बाळगू नये, असेही सूचित केले आहे.