सातारा जिल्ह्यात तीन अपघातांत चार ठार; पाच जखमी; अपघातांना ट्रक कारणीभूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 15:56 IST2025-03-10T15:55:54+5:302025-03-10T15:56:11+5:30
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात विविध तीन ठिकाणी झालेल्या अपघातांत चार ठार तर पाच जण जखमी झाले. जखमींवर जिल्हा ...

सातारा जिल्ह्यात तीन अपघातांत चार ठार; पाच जखमी; अपघातांना ट्रक कारणीभूत
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात विविध तीन ठिकाणी झालेल्या अपघातांत चार ठार तर पाच जण जखमी झाले. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे अपघात रविवारी दिवसभरात झाले.
साताऱ्यातून पुण्याला ईदची खरेदी करण्यासाठी शेख आणि मोमीन कुटुंबीय कारने निघाले होते. हे सर्व जण सकाळी घरातून बाहेर पडले. सलमान पठाण (वय २३, रा. मेढा, ता. जावळी) हा कार चालवत होता. पाचवड येथे त्यांची कार पोहोचली असता महामार्गालगत एक ट्रक उभा होता. या ट्रकला त्यांच्या कारची पाठीमागून जोरदार धडक बसली. यात नाहीद जमीर शेख (३८, रा. शनिवार पेठ, सातारा), सलमा इरफान मोमीन (४१, रा. सांगली) या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर कैफ इरफान मोमीन (१४), इरफान इकबाल मोमीन (४०, दोघेही रा. सांगली), बशीर महामूद शेख (७३, रा. शनिवार पेठ, सातारा) आणि चालक सलमान पठाण हे जखमी झाले. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुसरा अपघात शेंद्रे, ता. सातारा गावच्या हद्दीत दुपारी तीनच्या सुमारास झाला. दिगंबर मनोज शिंदे (वय २२, रा. तामकणे, ता. पाटण), योगिनी काशिनाथ जाधव (१७, रा. निवकणे, ता. पाटण) हे दोघे दुचाकीवरून साताऱ्याकडे येत होते. शेंद्रेजवळ आल्यानंतर चुकीच्या दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. यात दिगंबर शिंदे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर योगिनी जाधव गंभीर जखमी झाली. अपघातानंतर रुग्णवाहिकेने दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सिव्हिलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर योगिनी हिला साताऱ्यातील खासगी रुग्णालयात हलविले.
तिसरा अपघात सातारा बसस्थानकासमोर सायंकाळी पाच वाजता झाला. शिवाजी राजाराम मोरे (४२, रा. राकुसलेवाडी, ता. सातारा) हे दुचाकीवरून पोवई नाक्याकडे निघाले होते. बसस्थानकासमोर आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला शेजारून जाणाऱ्या अन्य एका दुचाकीची धडक बसली. यात ते खाली पडले. याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताला तीन ट्रक कारणीभूत..
रविवारी दिवसभरात तीन अपघात झाले. या तिन्ही अपघातांना ट्रक कारणीभूत झाले. सातारा शहरात वर्दळीच्या ठिकाणी मालट्रकने प्रवेश केल्याने अपघात झाला. तर शेंद्रेजवळ चुकीच्या दिशेने ट्रकचालकाने येऊन दुचाकीस्वाराला उडवले. पाचवडमध्येही उभ्या ट्रकला पाठीमागून कार धडकून दोन महिलांना जीव गमवावा लागला.