कैलास स्मशानभूमीत सातारा पालिकेकडून चार अग्निकुंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:39 AM2021-04-21T04:39:29+5:302021-04-21T04:39:29+5:30

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असताना मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही आता वाढले आहे. त्यामुळे संगममाहुली येथील कैलास ...

Four fire pits from Satara Municipality in Kailas Cemetery | कैलास स्मशानभूमीत सातारा पालिकेकडून चार अग्निकुंड

कैलास स्मशानभूमीत सातारा पालिकेकडून चार अग्निकुंड

Next

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असताना मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही आता वाढले आहे. त्यामुळे संगममाहुली येथील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार व्यवस्थेवर प्रचंड ताण पडू लागला आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या आदेशाने स्मशानभूमीत उपलब्ध वीस अग्निकुंडांव्यतिरिक्त स्वतंत्र चार अग्निकुंड पत्र्याच्या शेडसह बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली.

सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. दररोज एक ते दीड हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत तर तीस ते चाळीस रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. कोरोनामुळे दगावणाऱ्या बाधितांवर साताऱ्यातील संगममाहुली येथील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. अंत्यसंस्काराची जबाबदारी सातारा पालिकेच्या खांद्यावर असून, सध्या बळींचे प्रमाण वाढल्याने अग्निसंस्काराच्या एकूणच व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी अंत्यसंस्कार व्यवस्थेवरील हा ताण कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उदयनराजे यांनी कैलास स्मशानभूमीत स्वतंत्र चार अग्निकुंड संपूर्ण व्यवस्थेसह बसविण्याचे पालिका प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्यानुसार उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी तत्काळ कैलास स्मशानभूमीला भेट देऊन यंत्रणा कामाला लावली. सध्या स्मशानभूमीत वीस अग्निकुंड आहेत. यापैकी दहा अग्निकुंड कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी राखीव आहेत. मात्र कोरोना बळींचा आकडा पन्नाशीच्या दिशेने निघाल्याने अंत्यसंस्कारासाठी तिष्ठत राहणे आणि शिवाय कुटुंबियांना मनस्ताप असे अनुभव सध्या येत आहेत. याच गैरसोयीवर जादा अग्निकुंड बसविण्याचा तोडगा खा. उदयनराजे यांनी काढत तो तत्काळ अंमलात येईल याची व्यवस्था केली आहे.

उपलब्ध अग्निकुंडांपासून समान अंतरावर सहा नवीन अग्निकुंड पत्र्याच्या शेडसह बसविण्याचे काम प्रगतीपथावर असून यातील चार अग्निकुंड युद्धपातळीवर बसविण्यात आल्याचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी सांगितले. हा सर्व खर्च नगरपालिका फंडातून करण्यात येणार आहे. पालिकेच्या चार अग्निकुंडांमुळे कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी एकूण चौदा अग्निकुंड उपलब्ध होणार आहेत. पुढील टप्प्यात स्मशानभूमीसाठी स्वतंत्र गॅस दाहिनी बसविण्याची योजना सातारा पालिकेने आखली असून, याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.

Web Title: Four fire pits from Satara Municipality in Kailas Cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.