चोरट्याकडून 4 दुचाकी जप्त, पोलिसी खाक्या दाखवताच तोंड उघडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 21:53 IST2019-07-14T21:47:49+5:302019-07-14T21:53:36+5:30
सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या गुन्ह्यांचा तत्काळ छडा लावण्याचे आदेश दिले होते.

चोरट्याकडून 4 दुचाकी जप्त, पोलिसी खाक्या दाखवताच तोंड उघडले
सातारा : सातारा तालुक्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जितेंद्र उर्फ बबन हिंदूराव मोरे (वय २३, रा. गजवडी, ता. सातारा) याला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या गुन्ह्यांचा तत्काळ छडा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. एक युवक विविध प्रकारच्या दुचाकी वापरत असल्याची माहिती डीबी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक किरण शाळीग्राम यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी हवालदार दादा परिहार, सुजीत भोसले, राजू मुलाणी, रमेश चव्हाण, संदीप कुंभार यांना संबंधित युवकाला पकडण्यासाठी पाठविले. पोलिसांनी सापळा लावून गजवडी परिसरात युवकाला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने जितेंद्र मोरे असे त्याचे नाव सांगितले. त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. मात्र, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.
अखेर त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चार मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्याने घराच्या परसिरात लपवून ठेवलेल्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या दुचाकी त्याने शाहूपुरी आणि सातारा शहर परिसरातून चोरल्या असल्याचे तपासात पुढे आले आहे.