Satara-Local Body Election: कराडला दक्षिण-उत्तरचे ‘पाटील’ पुन्हा एकत्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 18:51 IST2025-11-24T18:49:07+5:302025-11-24T18:51:38+5:30
पालिका निवडणुकीच्या निमित्ताने नव्या आघाडीचा ‘उदय’

Satara-Local Body Election: कराडला दक्षिण-उत्तरचे ‘पाटील’ पुन्हा एकत्र!
प्रमोद सुकरे
कराड : राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो, असे सांगितले जाते. त्याचे प्रत्यंतर शनिवारी रात्री पुन्हा एकदा कराडकरांना आले. कराड पालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने अंतर पडलेले कराड दक्षिण-उत्तरचे दोन ‘पाटील’ पुन्हा एकदा एकत्र आले. मंत्री शंभूराज देसाई यांच्या साक्षीने हे दोन्ही पाटील कराडकरांना एकाच उघड्या जीपमध्ये दिसले अन् नव्या राजकीय समीकरणांचा ‘उदय’ सर्वांच्या लक्षात आला.
कराडला दक्षिण व उत्तर असे विधानसभेचे दोन मतदारसंघ आहेत. या दोन्ही मतदारसंघांवर प्रदीर्घ काळ दोन कुटुंबांनी पाटीलकी केली. या दोन्ही कुटुंबांमध्ये जुन्या पिढीत खूपच चांगला समन्वय होता; पण नव्या पिढीच्या हातात सूत्रे गेल्यानंतर या समन्वयाला ‘ब्रेक’ लागला अन् आता दोन्ही मतदारसंघ पाटील परिवाराच्या ‘हाता’त राहिलेले नाहीत.
तालुक्याच्या राजकारणात पंचायत समिती, बाजार समिती, साखर कारखाना, नगरपालिका आदी निवडणुकांत नेहमीच दिवंगत ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर व दिवंगत माजी आमदार पी. डी. पाटील यांनी समन्वय ठेवत राजकारण केले. दोन्ही विधानसभा मतदारसंघांवरही आपला प्रभाव कायम ठेवला. नंतरच्या काळात बाळासाहेब पाटील व ॲड. उदयसिंह पाटील ही पिढी त्यांचा वारसा चालवू लागली; पण या दोन परिवारातील समन्वय मात्र पूर्वीसारखा राहिला नाही. त्यामुळे आता दोन्ही मतदारसंघांची आमदारकी रेठरे आणि मत्यापूरला सरकली आहे.
पण कराड नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी भाजपला रोखण्यासाठी सर्वांना बरोबर घेत यशवंत-लोकशाही आघाडी रिंगणात उतरवली आहे. शनिवारी त्याच्या प्रचाराचा शुभारंभ पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात झाला. त्यानंतर शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत माजी आमदार बाळासाहेब पाटील, ॲड. उदयसिंह पाटील, राजेंद्रसिंह यादव आदी चावडी चौक परिसरात उघड्या गाडीमध्ये काही काळ एकत्रित दिसल्याने पुढील नवी समीकरणे कशी असणार? याचे संकेत निश्चितच समजत आहेत.
जिल्हा बँकेची निवडणूक ठरली होती कळीचा मुद्दा!
राज्यात आघाडीचे सरकार असताना बाळासाहेब पाटील यांना सहकार मंत्रिपदाची संधी मिळाली. यादरम्यान झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून नेमके कोणी उभे राहायचे? यावरून बाळासाहेब पाटील व उदयसिंह पाटील यांच्यात ठिणगी पडली. दोघांनी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले. यावेळी डॉ. अतुल भोसले यांची बाळासाहेब पाटील यांना मदत झाली. त्यांनी जिल्हा बँकेचा गड सर केला; पण तेव्हापासून दक्षिण-उत्तरच्या पाटलांमध्ये अंतर पडत गेले होते.