पावसाचा जोर कमी; सातारा जिल्ह्यात पूर ओसरला, कोयनाचे दरवाजे तीन फुटांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 15:47 IST2025-08-22T15:47:36+5:302025-08-22T15:47:59+5:30
पाटणला सर्वाधिक नुकसान..; पंचनामे सुरू

पावसाचा जोर कमी; सातारा जिल्ह्यात पूर ओसरला, कोयनाचे दरवाजे तीन फुटांवर
सातारा : सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून, दिवसभरात कोयनाला १७, तर महाबळेश्वरमध्ये १४ मिलिमीटरची नोंद झाली. त्यातच प्रमुख धरणांमधील विसर्ग कमी झाल्याने पूरही ओसरला आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत पावसामुळे २८ घरे आणि ८५ दुकानांना फटका बसल्याचे समोर आले. तरीही, पंचनाम्याचे काम सुरू असल्याने नुकसानीचा आकडा वाढणार आहे. तर, दिवसभरात कोयनाचे दरवाजाचे १३ वरून ३ फुटांपर्यंत खाली घेण्यात आले आहेत.
जिल्ह्यात चार दिवस पाऊस पडला. विशेषत: पश्चिम घाट आणि सातारा, पाटण, जावळी, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यात अतिवृष्टी झाली. पश्चिमेकडील प्रमुख सहा धरण पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस झाला. यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करावा लागला. परिणामी अनेक पूल आणि रस्तेही पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली होती.
मात्र, बुधवारी दुपारपासून पाऊस कमी झाला. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे ६९, नवजाला ७८, तर महाबळेश्वरला १२५ मिलिमीटर पाऊस झाला. तर, सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत कोयना आणि नवजा येथे प्रत्येकी १७ आणि महाबळेश्वरला १४ मिलिमीटर पर्जन्यमान झाले.
कोयना पाणलोट क्षेत्रातही पाऊस कमी आहे. गुरुवारी पहाटेपर्यंत धरणाचे दरवाजे १३ फुटांवर स्थिर होते. पण, सकाळी सहा वाजता ११ फुटांपर्यंत खाली घेण्यात आले. त्यानंतर १० वाजता ९ फूट, दुपारी तीनला ७, सायंकाळी सहाला साडेचार फूट, तर रात्री नऊ वाजता दरवाजे ३ फुटांपर्यंत खाली घेण्यात आले. त्यामुळे दरवाजातून १९ हजार ८०० आणि पायथा वीजगृह २ हजार १००, असा एकूण २१ हजार ९०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू होता. तर, सायंकाळी पाचला कोयना धरणात ९९ टीएमसी पाणीसाठा होता.
पंचनामे करण्याची पालकमंत्र्यांची सूचना..
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी कराड, तसेच सातारा तालुक्यात पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच, कराडला शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन पावसातील नुकसानीचे पंचनामे तत्काळ पूर्ण करावेत. अतिवृष्टीतील मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली.
पाटणला सर्वाधिक नुकसान..
पावसामुळे सर्वाधिक नुकसान पाटण तालुक्यात झाले आहे. १६ घरे पडली असून, ७९ दुकाने बाधित झाली आहेत. तर महाबळेश्वर तालुक्यात ५, कराड ३, सातारा २ आणि वाई व फलटण तालुक्यात एक घर पडले आहे. तसेच पाटण तालुक्यात एका शेळीचा मृत्यू झाला आहे. वाई तालुक्यात ६ दुकानदारांनाही नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.