Satara Crime: हनी ट्रॅप प्रकरणात तीन महिलांसह पाचजण अटकेत, पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 13:40 IST2025-07-22T13:40:31+5:302025-07-22T13:40:50+5:30
सेवानिवृत्त ७१ वर्षीय नायब तहसीलदाराला बनाव रचून लुटले

Satara Crime: हनी ट्रॅप प्रकरणात तीन महिलांसह पाचजण अटकेत, पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सातारा : सेवानिवृत्त ७१ वर्षीय नायब तहसीलदाराला ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात ओढून लुटल्याचे पोलिस तपासात समोर आले. याप्रकरणी तीन महिलांसह पाचजणांना सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने अटक केली.
शीला विमलेश विश्वकर्मा (वय ४२, रा. अमरलक्ष्मी, देगाव फाटा), लक्ष्मी शिवाजी भोसले (५३, रा. कोरेगाव), राजेंद्र भगवान मोहिते (४५, रा. लक्ष्मीनगर, कोरेगाव), संजय धनाजी भिसे (३४, रा. कोरेगाव), रंजना नामदेव चव्हाण (६७, रा. कोरेगाव), अशी पोलिसांनी अटक करण्यात आलेल्यांची आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त नायब तहसीलदारांना ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात ओढण्यासाठी या पाच संशयितांनी लुटीचा बनाव रचला. घरात शिरून मोबाइल शूटिंग केल्याचे सांगत वृद्ध व संबंधित महिलेकडील दागिने लुटले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वृद्धासोबत असलेल्या महिलेकडे चौकशी केली. त्यावेळी हा बनाव उघड झाला. कोणाला शंका येऊ नये म्हणून संबंधित महिलेने स्वत:चे दागिने लुटण्यास संशयितांना सांगितल्याचे तपासात समोर आले. या संशयितांकडून पोलिसांनी जबरी चोरी करून नेलेले दागिने, एक चारचाकी, असा सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक डाॅ. वैशाली कडूकर, पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शामराव काळे, पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, विजय शेलार, हवालदार सुजित भोसले, नीलेश जाधव, नीलेश यादव, विक्रम माने, पंकज मोहिते, सुशांत कदम, तुषार भोसले, सचिन रिटे, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुहास कदम यांनी या कारवाईत भाग घेतला.