Satara: सालपे घाटात धावत्या डंपरला भीषण आग, डंपर जळून खाक; चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 16:42 IST2026-02-18T16:41:27+5:302026-02-18T16:42:06+5:30
तासभर वाहतूक ठप्प

Satara: सालपे घाटात धावत्या डंपरला भीषण आग, डंपर जळून खाक; चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली
पिंपोडे बुद्रुक : लोणंद – सातारा राज्य मार्गावरील सालपे घाटात मंगळवारी धावत्या डंपरला अचानक आग लागून डंपर पूर्णपणे जळून खाक झाला. चालकाने वेळीच प्रसंगावधान राखल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली होती.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
याबाबत सविस्तर वृत्त असे की, डंपर (एचआर ४६ एफ ०९४५) हा लोणंद येथून वाठार स्टेशनच्या दिशेने महामार्गाच्या कामासाठी खडी घेऊन निघाला होता. सालपे घाट पार करून वाठारच्या दिशेने येत असताना सकाळी अकराच्या सुमारास डंपरच्या इंजिन भागातून अचानक धूर निघू लागला व क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने तत्काळ डंपर रस्त्याच्या कडेला थांबवून पळ काढला. डंपरच्या वायरिंगमधून आग डिझेल टाकीपर्यंत पोहोचल्याने आगीचा भडका अधिक वाढला. काही वेळातच डंपरची केबिन पूर्णपणे जळून राख झाली.
दरम्यान, आगीमुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच वाठार पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शरयू साखर कारखान्याचा अग्निशामक बंब पाचारण करून आग आटोक्यात आणली. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. डंपरला लागलेली आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.