अखेर बांधकामास मुहूर्त..

By Admin | Updated: August 17, 2015 00:13 IST2015-08-16T21:39:45+5:302015-08-17T00:13:14+5:30

कऱ्हाड बसस्थानकाची मुख्य इमारत पाडली : जेसीबीच्या साह्याने युद्धपातळीवर कामास प्रारंभ

Finally, the construction of the dam | अखेर बांधकामास मुहूर्त..

अखेर बांधकामास मुहूर्त..

कऱ्हाड : येथील बसस्थानकाच्या बांधकामास हिरवा कंदील मिळाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी अधिकृतपणे बसस्थानकाच्या जुन्या इमारतीवर संबंधित ठेकेदाराने हातोडा मारला. दोन जेसीबी, डंपर तसेच कामगारांचा लवाजमा सोबत घेऊन बांधकाम अधिकारी व ठेकेदारांनी बसस्थानकाची मुख्य इमारत पाडली. गुरुवारपासून सुरू केलेल्या इमारत पाडण्याचा काम हे आठ-दहा दिवस चालणार आहे. दोन वर्षांपासून रखडलेल्या इमारत बांधकामास अखेर मुहूर्त मिळाला आहे. बसस्थानक बांधकामास शासनाकडून अधिकृतपणे हिरवा कंदील मिळाल्यानंतर रविवार, दि. ९ आॅगस्ट रोजी संबंधित ठेकेदाराने बसस्थानकाचे बांधकाम करण्यासाठी ताबा घेतला. त्यातून गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बांधकाम अधिकारी व ठेकेदारांनी अधिकृतपणे बसस्थानक इमारत पाडण्यास प्रारंभ केला. बसस्थानकातील कोल्हापूर मार्गाकडे जाणाऱ्या फलाटाच्या इमारतीकडील बाजू पाडण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. बांधकामास अडथळा येऊ नये म्हणून बांधकाम विभागाकडून इमारतीभोवती पत्र्याचे कुंपण उभारण्यात आले आहेत.
आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदी असताना ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निधीतून ११ कोटी बसस्थानकाच्या बांधकामास मंजूर केले. त्यातून हे बांधकाम केले जात आहे.
कऱ्हाड येथील बसस्थानकातील पाडण्यात आलेल्या बांधकामाचे साहित्य हे शहराबाहेर टाकण्यासाठी पालिकेकडून बसस्थानक प्रशासनास जागा देण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणाहून अन्य ठिकाणी प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. येथून सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईल अनेक बस धावत असतात. आता शहरात बस येणार नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. बसस्थानकातील जागेच्या उपलब्धतेअभावी प्रवाशांची होणारी गैरसोय विचारात घेणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)

‘मनसे’ची बसस्थानकाबाबत
चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी
कऱ्हाड बसस्थानकातील इमारत पाडण्याचे काम सध्या सुरू असल्याने त्याचा त्रास हा प्रवासी व विद्यार्थ्यांना होत आहे. कोल्हापूर नाका येथे प्रवाशांना बसमधून उतरविले जात असल्याने प्रवाशांना पैसे खर्च करून शहरात यावे लागत आहे. तरी प्रवासी व विद्यार्थ्यांना होणारा त्रास हा कमी करण्यासाठी एसटी प्रशासनाने कोल्हापूर नाका ते शहर बस सुरू करावी, या प्रश्नाबाबत सहकारमंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी लक्ष घालावे, अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना शुक्रवारी निवेदन दिले.

कऱ्हाड आगाराची स्थलांतरप्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, आगाराचे बांधकाम पाडण्यास देखील गुरुवारपासून सुरू करण्यात आले आहे. इमारत परिसरातील २५ टक्के जागा ही आगार प्रशासनास वापरण्यासाठी देण्यात आली आहे.
- जे. के. पाटील, आगार प्रमुख, कऱ्हाड

Web Title: Finally, the construction of the dam