सातारा जिल्हा परिषदेत ‘लाचलुचपत’चा छापा, २५ हजार घेताना महिला अधिकारी सापडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 17:16 IST2025-10-29T17:13:58+5:302025-10-29T17:16:09+5:30
सेवानिवृत्त शिक्षकाच्या निवड श्रेणी प्रस्ताव मंजुरी आदेशासाठी घेतली लाच

सातारा जिल्हा परिषदेत ‘लाचलुचपत’चा छापा, २५ हजार घेताना महिला अधिकारी सापडली
सातारा : सातारा जिल्हा परिषद इमारतीतील माध्यमिक शिक्षण विभागात सेवानिवृत्त शिक्षकाच्या निवड श्रेणी प्रस्ताव मंजुरी आदेशासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. यामुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे. तर याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखलची प्रक्रिया सुरू झाली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी वैशाली शंकर माने (रा. क्षेत्र माहुली, ता. सातारा) या वरिष्ठ सहायक महिला अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे. यातील तक्रारदार हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांचा २४ वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झालेला आहे. त्यामुळे २४ वर्षे सेवा कालावधी पूर्ण असलेला निवड श्रेणी प्रस्ताव तक्रारदार यांच्या शाळेने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात दाखल केला होता.
या प्रस्तावाच्या मंजुरी आदेशाच्या मागणीसाठी तक्रारदार हे वरिष्ठ सहायक वैशाली माने यांना भेटले होते. त्यावेळी माने यांनी साहेबांना देण्यासाठी म्हणून २५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पुणे येथील ‘लाचलुचपत’च्या पथकाने दि. २८ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागात सापळा रचला. तसेच २५ हजार रुपयांची मागणी करून स्वीकारताना वैशाली माने यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडाली आहे.