मारहाण करणाऱ्या मद्यपी पतीला पत्नी, मुलगा अन् मुलीने संपविले; सातारा जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 13:53 IST2025-07-28T13:52:05+5:302025-07-28T13:53:36+5:30
आवडीची भाजी न केल्याने पत्नीला केली होती मारहाण

मारहाण करणाऱ्या मद्यपी पतीला पत्नी, मुलगा अन् मुलीने संपविले; सातारा जिल्ह्यातील घटना
उंब्रज (जि.सातारा) : मद्यपी पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पत्नीने मुलगा आणि मुलीला सोबत घेऊन पतीचा खून केला. ही धक्कादायक घटना पाटण तालुक्यातील सवारवाडी येथे रविवारी समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी, मुलगा आणि मुलीला अटक केली आहे.
रमेश कोंडिबा खरात (वय ४५) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात पत्नी लक्ष्मी रमेश खरात (वय ४२), मुलगा हरीश (२२), मुलगी अश्विनी उमेश शिंदे (२४) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे.
रमेश खरात हे दारूच्या व्यसनाधीन झाला होता. काही कामधंदाही करीत नव्हता. क्षुल्लक कारणावरून पत्नी लक्ष्मी हिला वारंवार मारहाण करायचा. शुक्रवारी (दि. २५) रात्री दहा वाजता रमेश खरात दारू पिऊन घरी आला. यावेळी त्याच्या आवडीची भाजी केली नाही, म्हणून पत्नीला त्याने मारहाण केली, तसेच मुलगी अश्विनी शिंदे ही वाद सोडविण्यासाठी गेली असता, तिलाही मारहाण केली होती.
ही घटना अश्विनीने तिचा भाऊ हरीश याला सांगितल्यानंतर तो घरी आला. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पुन्हा रमेश खरात यांनी पत्नी, मुलगा व मुलीशी वादावादी, शिवीगाळ सुरू केली. त्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्या तिघांनी रमेश खरात याला लाकडी दांडक्याने हातावर, पायावर मारहाण केली. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.