लोणंद एमआयडीसीतील कंत्राटावरून कामगारांवर जीवघेणा हल्ला; दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 19:31 IST2023-03-07T19:30:51+5:302023-03-07T19:31:14+5:30
याबाबत अधिक तपास लोणंद पोलीस करीत आहेत

लोणंद एमआयडीसीतील कंत्राटावरून कामगारांवर जीवघेणा हल्ला; दोघे गंभीर जखमी
मुराद पटेल
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील लोणंद औद्योगिक परिसरातील कामगार ठेक्याच्या कारणावरून एका कामगार कंत्राटदाराने दुसर्या कामगार कंत्राटदाराच्या कामगारांवर प्राणघातक हल्ला करायला लावल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सोमेश्वर जि. पुणे येथील कंञाटदारासह इतरांवर लोणंद पोलिस स्टेशनला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लोणंद औद्योगिक परिसरातील पुष्पक कंपनीत कामासाठी आलेल्या सात कामगारांवर गुंडानी चाकू तसेच लाकडी दांडक्याने केलेल्या हल्ल्यात दोन कामगार गंभीर जखमी झालेत. तर पाच कामगार किरकोळ जखमी झालेत. हा हल्ला त्याच कंपनीतील जुना कंत्राटदार अजय तात्याबा सावंत याच्या सांगण्यावरून केला असल्याची तक्रार परप्रांतीय कामगार दिनेश सिंग फुल सिंग (रा. मध्यप्रदेश सध्या रा.गोळेगाव) याने लोणंद पोलीस स्टेशनला दिली आहे.
या घटनेत कामगार दिनेश सिंग फुल सिंग याच्यासह श्रवन कुमार भुईया हे दोघे गंभीर जखमी झाले. तर राजन कोरचे, राम गोपाल साकेत, सुभाष पठारे, राजेश कुमार चौधरी व अन्य असे पाचजण किरकोळ जखमी झाले. जखमीवर लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी व लोणंद सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
याप्रकरणी लोणंद पोलिसात कंत्राटदार अजय सावंत याच्यासह अन्य सहाजणांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास लोणंद पोलिस करीत आहेत.