Satara: जमिनीवर तुटून पडलेल्या वीज वाहक तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 17:42 IST2025-07-26T17:41:23+5:302025-07-26T17:42:41+5:30
घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध केली. त्यावेळी शेताच्या माळरानावर मृतदेह आढळून आला

संग्रहित छाया
कोयनानगर : मेंढेघर, कदमवाडी, ता. पाटण येथे गुरुवारी वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर तुटून पडलेल्या वीज वाहक तारेला स्पर्श झाल्याने शेतकरी मोहन अंबाजी कदम (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला.
स्थानिक नागरिकांनी दिलेली माहिती अशी की, कोयना विभागातील मेंढेघर (कदमवाडी) येथील शेतकरी मोहन अंबाजी कदम हे गुरुवार, दि. २४ रोजी सकाळच्या सुमारास जनावरे चारावयास गेले होते. सायंकाळी जनावरे घरी परतली. मात्र, मोहन कदम हे घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध केली. त्यावेळी शेताच्या माळरानावर त्यांचा मृतदेह आढळून आला. त्याचठिकाणी शेजारी वीज वाहक तार तुटून जमिनीवर पडली होती. या तारेला स्पर्श झाल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळेच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने सदर कुटुंब गरीब असल्याने त्या कुटुंबास आर्थिक मदत द्यावी अन्यथा मृतदेह हलवणार नाही, असा इशारा देत मागणी लावून धरली. तद्नंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मयत व्यक्तीच्या कुटुंबीयांना तातडीची मदतीसह तसेच उर्वरित मदत पंचनामा करून मृत्यूचा अहवाल सादर झाल्यावर देण्यात येईल, असे लेखी पत्र दिल्यानंतर मृतदेह पाटण येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला. रात्री उशिरा शवविच्छेदन केल्यानंतर मेंढेघर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गंजलेल्या खांबांचाही धोका
दरम्यान, कोयना विभागात अनेक ठिकाणी गंजलेले विद्युत पोल धोकादायक परिस्थितीत उभे आहेत. काही ठिकाणी विद्युत वाहक तारा खराब झाल्या असून त्या लोंकबळत आहेत. याची वारंवार तक्रार करूनही महावितरण कंपनी त्याकडे दुर्लक्ष करत असून या कामांना निधी उपलब्ध नाही, असे कारण पुढे केले जात असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.
कोयना विभागातील पावसाची व वाऱ्याची तीव्रता लक्षात घेता पावसाळ्यापूर्वी गंजलेले पोल बदलून विद्युत वाहक तारांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. मात्र, महावितरण कंपनीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. - नंदकुमार सुर्वे, अध्यक्ष, भाजपा पाटण तालुका