Shiv Pratap Din 2025: किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिनाचा अपूर्व उत्साह, शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 17:20 IST2025-11-28T17:19:59+5:302025-11-28T17:20:28+5:30

Shiv Pratap Din 2025 Celebration: लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा अन् पोवाडाही...

Extraordinary enthusiasm on Shiv Pratap Din at Fort Pratapgad | Shiv Pratap Din 2025: किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिनाचा अपूर्व उत्साह, शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव

Shiv Pratap Din 2025: किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिनाचा अपूर्व उत्साह, शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव

सातारा : ढोल-ताशांचा निरंतर गजर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष, रोमांच उभा करणाऱ्या तुताऱ्यांचा निनाद, झांजांचा आवाज अन् हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, शिवकालीन धाडशी खेळांची अंगावर शहारे आणणारी प्रात्यक्षिके.. अशा अलोट उत्साहात किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला.

महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडावर गुरुवारी शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. यासाठी सकाळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात भवानी मातेची महापूजा करण्यात आली. पुजारी शंकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले. तसेच भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून भगव्या ध्वजाचे रोहण करण्यात आले. यावेळी ढोल, तुताऱ्या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता.

भवानी मातेची आरती झाल्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची वाजत मिरवणूक सुरू झाली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली. पालखीचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर पुतळा आणि पालखीस पुष्प अर्पण करून भक्तिभावे पूजन करण्यात आले. यावेळी ‘क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज...’ या ललकारीने वातावरण भारून गेले होते. नंतर पुतळ्यासमोरील चबुतऱ्यावर जिल्हाधिकारी पाटील यांनी ध्वजारोहण केले. तर सातारा पोलिस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली.

यावेळी वाईचे प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, महाबळेश्वर तहसीलदार सचिन मस्के, वाडा कुंभरोशीच्या सरपंच ज्योती सावंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तसेच शिवप्रेमी नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लाठी - काठी, तलवारबाजी, दांडपट्टा अन् पोवाडाही...

छावा युवा मंचचे अध्यक्ष उदय यादव यांनी लहान-मोठ्या विद्यार्थ्यांसह लाठी - काठी, तलवारबाजी, दांडपट्टा, कुऱ्हाडबाजी, अग्निचक्र, गनिमीकावा आदी ऐतिहासिक खेळांची डोळ्यांची पारणे फेडणारी प्रात्यक्षिके सादर केली. ही प्रात्यक्षिके पाहण्यासाठी माेठी गर्दी झाली होती. तर शाहीर संभाजी जाधव आणि सहकाऱ्यांनी ‘प्रतापगडचा रणसंग्राम’ हा जोशपूर्ण पोवाडाही सादर केला.

Web Title : प्रतापगढ़ किले में शिव प्रताप दिवस धूमधाम से मनाया गया

Web Summary : प्रतापगढ़ किले में शिव प्रताप दिवस उत्साहपूर्वक मनाया गया। हेलिकॉप्टर से फूलों की वर्षा, पारंपरिक खेल और पालकी जुलूस शामिल थे। वातावरण भक्ति और ऐतिहासिक प्रदर्शनों से भरा था, जिसमें शिवाजी महाराज का सम्मान किया गया।

Web Title : Shiv Pratap Day Celebrated at Pratapgad Fort with Great Fervor

Web Summary : Shiv Pratap Day was celebrated with enthusiasm at Pratapgad Fort. Events included a helicopter flower shower, traditional games, and a palanquin procession. The atmosphere was filled with devotion and historical reenactments, honoring Shivaji Maharaj.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.